बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 17 मे 2021 (22:26 IST)

कोरोना : शाहीद जमील यांनी दिला कोव्हिड पॅनलच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

भारत सरकारच्या INSACOG पॅनलचे अध्यक्ष डॉ. शाहीद जमील यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. डॉ. शाहीद जमील हे वरिष्ठ साथरोगतज्ज्ञ आहेत.
 
कोरोना विषाणूच्या वेगवेगळ्या प्रकारांचा (व्हेरियंट) शोध घेण्यासाठी भारत सरकारनं एक पॅनल तयार केलं होतं. सार्स-सीओव्ही-2 जिनोम सिक्वेन्सिंग कंसोर्टिया (INSACOG) नावाचं हे पॅनल होतं.
 
रॉयटर्सशी बोलताना डॉ. जमील यांनी त्यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. राजीनाम्याचं कारण मात्र त्यांनी स्पष्टपणे सांगितलं नाही. ते म्हणाले, "मी कारण सांगण्यास बांधील नाहीय."
मात्र, त्याचवेळी डॉ. जमील यांनी रॉयटर्सशी बोलताना असं म्हटलं की, "ज्यासाठी धोरण ठरवलंय, त्या पुराव्यांकडे विविध प्राधिकरणं लक्ष देत नाहीत."
 
INSACOG ची देखरेख करणारे बायोटेक्नोलॉजी विभागाच्या सचिव रेणू स्वरूप यांनी डॉ. शाहीद जमील यांच्या राजीनाम्यावर कुठलीच प्रतिक्रिया दिली नाहीय.
 
रॉयटर्स वृत्तसंस्थेनं केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचीही डॉ. जमील यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी कुठलाच प्रतिसाद दिला नाही.
INSACOG च्या आणखी एका सदस्यानं रॉयटर्सशी बोलताना म्हटलं की, सरकार आणि डॉ. जमील यांच्यात थेट मतभेदाची माहिती आपल्याला नाही.
 
याच पॅनलच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर रॉयटर्सला सांगितलं की, "डॉ. जमील यांच्या राजीनाम्यानं विषाणूनच्या विविध व्हेरियंटच्या शोधावर काही परिणाम होईल, असं मला वाटत नाही."
 
न्यूयॉर्क टाइम्समध्ये केलेली टीका
डॉ. जमील यांनी नुकतंच न्यूयॉर्क टाइम्स वृत्तपत्रात लेख लिहून भारतातील कोव्हिड-19 च्या हाताळणीवर टीका केली होती. कमी टेस्टिंग, लसीकरणाचा मंदावलेला वेग आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची आवश्यकता अशा मुद्द्यांना या लेखात स्पर्श केला होता.
 
डॉ. जमील यांनी लेखात लिहिलं होतं, "भारतातील माझे शास्त्रज्ञ साथी या सर्व पद्धतीचं समर्थन करतात. मात्र, त्यांना पुराव्यांवर आधारित धोरणांसाठी विरोधाचा सामना करावा लागतोय."
 
देशातील कोरोनासंबंधी डेटा जमवण्याबाबत डॉ. जमील म्हणाले होते, "30 एप्रिल रोजी 800 भारतीय शास्त्रज्ञांनी पंतप्रधानांना विनंती केली होती की, डेटा मिळायला हवा. जेणेकरून संशोधन, अंदाज आणि विषाणू रोखणं यांसाठी मदत होईल."
"कोरोनाची साथ नियंत्रणाबाहेर असताना, डेटाच्या आधारे निर्णय घेणं आताही घातक आहे," असं ते म्हणाले होते.
 
INSACOG च्या एका सदस्यानं 'द हिंदू' या वृत्तपत्राशी बोलताना म्हटलं की, डॉ. जमील यांच्या राजीनाम्याचं कारण सरकारी दबाव असू शकेल.
 
याआधीही टीकास्त्र
या महिन्याच्या सुरुवातीलाच रॉयटर्सनं एक बातमी छापली होती की, INSACOG ने मार्च 2021 च्या सुरुवातीलाच सरकारला सतर्क केलं होतं की, नवीन व्हेरियंट अधिक घातक असेल आणि तो भारतात पसरत आहे.
 
B.1.617 या व्हेरियंटशी भारत आता लढत आहे आणि इतर देशांच्या तुलनेत भारतात आता सर्वांत वाईट स्थिती आहे.
त्यावेळी रॉयटर्सनं डॉ. जमील यांच्याशी बातचीत केली होती. त्यावेळी ते म्हणाले होते, "त्या प्राधीकरणांबाबत काळजी वाटते, जे स्वत:च्या धोरणांअन्वये पुराव्यांवर लक्ष देत नाहीत."
 
कोरोनाची स्थिती ज्या प्रकारे भारत सरकारनं हाताळली आहे, त्यावरून टीका केली जात आहे. कुंभमेळ्याचं आयोजन असो वा स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर नेत्यांच्या मोठमोठ्या सभा असो, यांवर टीका होतेय.
 
भारतात गेल्या तीन आठवड्यात रोज सरासरी 3 लाखांहून अधिक कोरोनाग्रस्त सापडत आहेत, तसंच रोज 40 हजार जणांचा बळीही जातोय.