मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 17 मे 2021 (18:49 IST)

कोरोना लसीकरण: राहुल गांधी का म्हणतायत मला अटक करा?

मयांक भागवत
"मोदी जी, आमच्या लेकरांची लस परदेशात का पाठवली?" असे पोस्टर्स लावल्यानंतर दिल्ली पोलिसांनी अनेकांना अटक केली. त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले की हेच पोस्टर मी शेअर केलं आहे आता मला अटक करा. हा वाद नेमका काय आहे आणि हा सुरू कसा झाला याचा आढावा.
 
शनिवारी राजधानी दिल्लीत, "मोदी जी, आमच्या मुलांची लस परदेशात का पाठवली?" शेकडो पोस्टर्स रस्त्यांवर आढळले. या पोस्टर्समधून मोदी सरकारच्या 'व्हॅक्सिन मैत्री' कार्यक्रमावर प्रश्न उपस्थित करण्यात आलं होतं.
 
भारतात कोरोना संसर्गाचा झपाट्याने प्रसार होत असताना, कोव्हिडविरोधी लशींचा प्रचंड तुटवडा निर्माण झालाय. भारतीयांना लस मिळत नाहीये. मग, केंद्राने लस परदेशात का पाठवली? असा सवाल विरोधकांनी विचारलाय.
 
परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारताने आत्तापर्यंत 6 कोटी 60 लाखांपेक्षा जास्त लशी, 'व्हॅक्सिन मैत्री' कार्यक्रमांतर्गत परदेशात पाठवल्या आहेत.
दिल्ली पोलिसांनी पंतप्रधानांवर टीका करणाऱ्या या पोस्टर्स प्रकरणात अटकसत्र सुरू केलं. कॉंग्रेस आणि आम आदमी पक्षाने याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.
 
"मला अटक करा"
पंतप्रधान मोदींवर टीका करणारे पोस्टर लावल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी 25 लोकांना अटक केल्याची माहिती मिळतेय. दिल्ली पोलिसांच्या या कारवाईमुळे राजकीय वातावरण तापणं सहाजिक होतं.
सामान्यांना अटक का करता? आम्हालाही करा, असं म्हणत विरोधकांनी दिल्ली पोलिसांना खुलं आव्हान दिलं. कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी या पोस्टरचा फोटो ट्विट केला.
 
"मला सुद्धा अटक करा," असं राहुल गांधींनी लिहीलंय. तर, प्रियांका गांधी आणि कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी या पोस्टरचा फोटो आपल्या सोशल मीडियावर प्रोफाईल पिच्चर म्हणून ठेवलाय.
 
आम्ही पोस्टर्स लावले- आप
आम आदमी पक्षाचे नेते दुर्गेश पाठक यांनी, "पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणारे पोस्टर्स आपच्या कार्यकर्त्यांनी लावल्याचं मान्य केलं."
 
दिल्लीत पत्रकारांशी बोलताना ते म्हणतात, "भारतीयांसाठीची लस परदेशात का पाठवली? हा प्रश्न आम्ही विचारला. दिल्लीत मी पोस्टर्स लावले. पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांवर अटकेची कारवाई केली आहे."
 
"केंद्राने कोट्यवधी लशी परदेशात पाठवल्या. या लशी भारतातील लोकांचं लसीकरण करण्यासाठी वापरण्यात आल्या असत्या. पाकिस्तान, बांग्लादेश, इराण यांसारख्या 94 देशांमध्ये कोव्हिडविरोधी लशी पाठवण्यात आल्या," असं दुर्गेश पाठक यांनी पुढे सांगितलं.
 
भाजपची भूमिका
कॉंग्रेस आणि आम आदमी पक्षाने नेरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेनंतर भारतीय जनता पक्षानेही पटलवार केलाय.
 
भाजपचे महाराष्ट्र प्रवक्त केशव उपाध्ये म्हणतात, "हा आरोप म्हणजे अक्कल शून्यतेचा प्रकार आहे. जगभरात सर्वाधिक लसीकरण भारतात सुरू आहे. आजपर्यंत 18 कोटी लशी देण्यात आल्या आहेत."
 
"द ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सीनेशन एंड इम्युनायझेशन (GAVI) या धोराणानुसार काही लशी इतर देशांना देण्यात आल्या. लसनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर माल आयात करताना असलेल्या काही अटींमुळे परदेशात लशीचा पुरवठा करावा लागला," असं ते पुढे म्हणाले.
 
कोरोनासंकटात राजकारण करण्यापेक्षा आकडेवारी पहा, असा टोला केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.
 
'व्हॅक्सिन डिप्लोमसी' अंतर्गत परदेशात पाठवल्या लशी
 
आंतरराष्ट्रीय संबंधांना बळकटी देण्यासाठी केंद्राने भारतात बनवण्यात आलेल्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या कोरोनाविरोधी लशी परदेशात निर्यात करण्यास सुरुवात केली. ही 'व्हॅक्सिन डिप्लोमसी' भारताला विविध देशांसोबत संबंध दृढ करण्यासाठी महत्त्वाची मानली गेली.
 
परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, 17 मे पर्यंत भारताने 95 देशांना 'व्हॅक्सीन मैत्री' अंतर्गत 6 कोटी 63 लाख कोव्हिडविरोधी लशींचा पुरवठा केला आहे. ज्यात आशियाई देशांसोबत दक्षिण अफ्रिका, यूरोप, दक्षिण अमेरिका आणि आखाती देश सामिल आहेत.
 
नागपुरचे वकील प्रणय अजमेरा यांनी एप्रिल महिन्यात केंद्र सरकारने जगभरातील देशांना किती लशी पाठवल्या याची माहिती आरटीआय अंतर्गत परराष्ट्र मंत्रालयाकडून मागवली होती.
 
ते म्हणतात, "परदेशात पाठवण्यासाठी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सीन लशी स्वस्तात खरेदी करण्यात आल्या. आता लसनिर्मिती करणाऱ्या कंपन्या ही लस चढ्या दराने सरकार आणि रुग्णालयांना विकत आहेत. असं का झालं? याचं उत्तर मिळालेलं नाही."
 
परदेशात पाठवण्यात आलेल्या लशीबाबत केंद्राची भूमिका?
जगभरातील देशांना पाठवण्यात आलेल्या कोरोनाविरोधी लशींबाबत, संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत भारताच्या सदस्यांनी माहिती दिली होती. India at UN या ट्विटर हॅन्डलवर हा व्हिडीओ उपलब्ध आहे.
 
मार्च महिन्यात संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत बोलताना, भारताचे सदस्य (राजदूत) नागराज नायडू यांनी, 70 पेक्षा जास्त देशांना कोव्हिडविरोधी लस दिल्याची माहिती दिली होती.
 
"भारत येत्या सहा महिन्यात देशातील 3 कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण करणार आहे. आत्तापर्यंत, आमच्या नागरिकांना देण्यात आलेल्या लशीपेक्षा जास्त लशी जगभरात पाठवण्यात आल्या आहेत," असं नागराज नायडू संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत बोलताना म्हणाले होते.
तर, भाजपला सोडचिठ्ठी देत, ममता बॅनर्जींच्या तृणमूल कॉंग्रेसमध्ये सामिल झालेले, माजी केंद्रीय परराष्ट्र मंत्री यशवंत सिन्हा यांनीदेखील हा व्हीडिओ ट्वीट करत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर घणाघात केला.
ते म्हणतात, "संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत भारताने, देशातील लोकांना देण्यात आलेल्या लशीपेक्षा जास्त लशी परदेशात पाठवल्याची माहिती संयुक्त राष्ट्र संघाला दिली आहे. यामुळे नरेंद्र मोदी पूर्णत: उघडे पडले आहेत."
 
भारतात लसीकरणाची सद्यस्थिती
भारतात जानेवारी महिन्यात लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशभरात आत्तापर्यंत कोव्हिडविरोधी लशीचे 18 कोटी 29 लाख डोस देण्यात आले आहेत.
 
भारताने आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर, त्यानंतर 45 पेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण मोहीम खुली केली. पण, कोरोनासंसर्गाच्या दुसऱ्या त्सुनामीत युवावर्गात हा आजार मोठ्या प्रमाणात पसरला. त्यामुळे राज्यांच्या मागणीनुसार, केंद्राने 1 मे पासून 18 ते 44 वर्ष वयोगटातील लोकांसाठी लसीकरण खुलं केलं.
 
केंद्राने लसीकरण खुलं केलं असलं तरी लशींचा प्रश्न अजूनही संपलेला नाही. लशीचा प्रचंड मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवून लागल्याने सामान्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय. अनेक राज्यांनी लशींच्या पुरवठ्याअभावी 18 ते 44 वयोगटातील लसीकरण बंद केलंय.
 
देशातील लसींच्या तुटवड्याबाबत बोलताना निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही के पॉल म्हणाले, "डिसेंबर अखेरपर्यंत भारतात 2 अब्जपेक्षा जास्त लशी उपलब्ध होतील."
 
लशींच्या तुटवड्याचा प्रश्न येत्या एक-दोन महिन्यात संपेल अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलीये.