राज्य सरकारने दुजाभाव केला तरी महापालिका पुणेकरांना कोरोनाची लस उपलब्ध करून देणार : जगदीश मुळीक
राज्य सरकारने दुजाभाव केला तरी महापालिका पुणेकरांना कोरोनाची लस उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली.
लसीकरणासाठी जागतिक स्तरावरील निविदा काढण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी, मतदान केंद्रनिहाय लसीकरण सेंटर सुरू करावीत, कोरोनाच्या संभाव्य तिसर्या लाटेचा विचार करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, महापालिकेच्या पाचही विभागांमध्ये लहान मुलांवर उपचार करण्यासाठी रुग्णालये उभारावीत, पोस्ट कोविड सेंटर सुरु करावीत आदी मागण्या भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या समवेत झालेल्या बैठकीत केल्या. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुळीक बोलत होते.
कोरोनाच्या तिसर्या लाटेची शक्यता लक्षात घेता महापालिकेच्या वतीने कोविड सेंटर, विलगीकरण कक्ष, बेड्सची संख्या, ऑक्सिजनयुक्त बेड्सची संख्या, व्हेंटिलेटरयुक्त बेड्सची संख्या, ऑक्सिजनची उपलब्धता, औषधे, उपकरणे, लसीकरणाचे नियोजन याबाबत करायच्या उपाययोजना यावर ही बैठकीत चर्चा करण्यात आली.
या वर्षीच्या महापालिका अंदाजपत्रकात नमूद केलेल्या आरोग्य, शिक्षण आणि समाज विकास विभागाच्या योजनांना प्राधान्य द्यावे, प्रलंबित प्रकल्पांना गती द्यावी आणि स यादीतील स्थानिक स्तरावरील विकासकामांच्या मंजुरीची प्रक्रिया तातडीने सुरु करावी अशा मागण्या मुळीक यांनी या वेळी केल्या.