मंगळवार, 2 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 8 मे 2021 (08:35 IST)

महापालिकेची 15 लाख लस खरेदीची तयारी; राज्य सरकारने परवानगी द्यावी – महापौर

Municipal Corporation
पिंपरी-चिंचचवड शहरवासीयांच्या जीविताचा विचार करुन महापालिका 15 लाख कोरोना प्रतिबंधक लस स्वखर्चाने खरेदी करण्यास  तयार आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र शासनाची त्वरीत परवानगी मिळावी, अशी मागणी महापौर उषा ढोरे यांनी केली. महापौर ढोरे यांच्या  दालनात आयुक्त राजेश पाटील यांच्या समवेत झालेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आली.
 
कोरोना विषाणुचा वाढता संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्याकरिता महानगरपालिकेच्या वतीने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सर्व शहरवासीयांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.
 
तथापि, लशींच्या अपु-या पुरवठ्यामुळे लसीकरणाची संख्या कमी आहे. त्यामुळे लस उत्पादक कंपनीकडून सदर लस थेट खरेदी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यासंबंधीचा लस खरेदी करण्याचा ठराव नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभेत मंजूर करण्यात आला असल्याची माहिती महापौर ढोरे यांनी दिली.
 
तसेच महापालिका रुग्णालयातील कोरोनाविषयक कामकाज गतिमान होण्याकामी रुग्णालय प्रशासनासोबत नगरसदस्यांची टीम कार्यरत राहणार आहे. कोरोनाच्या तिस-या संभाव्य लाटेचा विचार करुन लहान मुलांना असणारा धोका टाळण्यासाठी त्यांचेकरिता स्वतंत्र हॉस्पिटल तयार करण्यासाठी  महापौरांनी आयुक्तांना निर्देश दिले.