शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 मे 2021 (16:05 IST)

मराठा आरक्षण : संभाजीराजे छत्रपती आणि उद्धव ठाकरे यांच्यातील बैठक सुरू

मराठा आरक्षणप्रकरणी राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सध्या बैठक सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थान येथे सुरू असलेल्या बैठकीला काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि राज्याचे महाधिवक्ते आशुतोष कुंभकोनी देखील उपस्थित आहेत.
 
यापूर्वी आज (28 मे) त्यांनी दुपारी 12 च्या सुमारास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचीही भेट घेतली.
 
मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर संभाजीराजे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षण मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय ज्येष्ठ नेत्यांची भेट घेण्याची मोहीमच उघडली आहे.
 
काल (गुरुवार, 27 मे) संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती.
 
संभाजीराजे हे आज दुपारी 12 च्या सुमारास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी दाखल झाले.
फडणवीस-संभाजीराजे यांनी सुमारे अर्धा तास मराठा आरक्षणप्रकरणी चर्चा केली.
 
तिथून संभाजीराजे थेट काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे रवाना झाले. त्यांच्याशी झालेल्या भेटीचा फोटोही त्यांनी माध्यमांसोबत शेअर केला आहे.
संयम राखण्याचं केलं होतं आवाहन
गेल्या काही दिवसांपासून संभाजीराजे सातत्याने विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत. पण सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर त्यांनीच मराठा बांधवांना संयम राखण्याचं आवाहन केलं होतं. योग्य वेळ आल्यानंतर आपण आपली भूमिका स्पष्ट करू, असं ते त्यावेळी म्हणाले होते.
मराठा आरक्षणप्रकरणी 5 मे 2021 रोजी सुप्रीम कोर्टाचा निकाल आला. सुप्रीम कोर्टाने आरक्षण फेटाळल्यानंतर राज्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली होती. मात्र संभाजीराजे छत्रपती यांनी संयत भूमिका घेतल्याचं दिसून आलं.
 
उद्रेक हा शब्द मराठा समाजाने सध्या तरी काढू नये, कोरोनाचा काळ आहे, त्यामुळे समाज बांधवांनी संयमी भूमिका घ्यावी, रस्त्यावर उतरू नये, असं आवाहन संभाजीराजे यांनी त्यावेळी केलं होतं.
 
यातून काय मार्ग काढावा, यासाठी आपण तज्ज्ञांशी चर्चा करणार आहे, असं संभाजीराजे म्हणाले होते.
दरम्यानच्या काळात संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यातील विविध भागांना भेटीगाठींवर भर दिला. त्यानंतर मागील आठवड्यात त्यांनी विविध जिल्ह्यांचा दौरा करत मराठा मोर्चा समन्वयक, कार्यकर्ते आणि कायदेतज्ज्ञ यांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर आता सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेताना ते दिसत आहेत.
 
संभाजीराजेंचा भाजपशी दुरावा?
संभाजीराजे छत्रपती यांची भारतीय जनता पक्षामार्फत राष्ट्रपती कोट्यातून खासदारपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याच भाजपशी संभाजीराजे यांचा दुरावा निर्माण झाल्याचं चित्र आहे.
एकीकडे संभाजीराजेंनी मराठा आरक्षणासाठी राज्याचा दौरा संपवून नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत, तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मात्र संभाजीराजेंवर टीकेची झोड उठवली आहे.
 
संभाजीराजे यांचा भाजपने किती सन्मान केला याबाबत ते का सांगत नाहीत, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजेंना विचारला आहे.
 
"छत्रपतींना पार्टी कार्यालयात यावं लागू नये म्हणून त्यांना राष्ट्रपती कोट्यातून खासदार केलं. संभाजीराजे यांना भाजपने किती सन्मान दिला हे ते सांगत नाहीत," असं चंद्रकांत पाटील म्हणालेत. तसंच मोदी संभाजीराजेंना याआधी खूपवेळा भेटल्याचा दावासुद्धा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
 
मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्य सरकारच्या अखत्यारीत असल्याने आणि कोरोनाची स्थिती गंभीर असल्यानेच पंतप्रधानांनी भेट नाकारल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
 
"मराठा आरक्षणाच्या प्रश्नी पंतप्रधानांकडे चार वेळा वेळ मागितली, ती मिळाली नाही," असं सांगत नाशिक इथं पत्रकार परिषदेत संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.
 
मराठा आरक्षणाबाबत आग्रही असलेल्या खासदार संभाजीराजेंनी वारंवार पत्र व्यवहार करूनही त्यांना मोदींना भेटता आलेलं नाही. याबाबत संभाजीराजे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर आता या मुद्यावर राजकारण सुरू झाल्याचं दिसतंय. 27 ऑक्टोबर 2020 रोजी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीतही नरेंद्र मोदी भेटीसाठी वेळ देत नसल्याचं संभाजीराजे यांनी सांगितलं होतं.
 
संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेत राज्यभर दौरे केल्यानंतर गुरुवारी (27 मे) मुंबईत काही नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यात शरद पवार आणि राज ठाकरे यांचा समावेश आहे.
 
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचीसुद्धा संभाजीराजे भेट घेणार आहेत.
 
' रस्त्यावर उतरण्याची वेळ'
मराठा आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली आहे, असं सांगत चंद्रकांत पाटील यांनी भाजपचा या आंदोलनाला पाठिंबा असल्याचंही सांगितलंय.
 
"मराठा समाजाने आज रस्त्यावर उतरुन संघर्ष नाही केला, तर वेळ निघून जाईल. त्यामुळे कोणताही झेडा, बॅच न घेऊन भाजपा आंदोलनात सहभागी होणार आहे," असं ते म्हणाले.
 
दुसरीकडे रस्त्यावर उतरून आंदोलन करू नका अशी भूमिता संभाजीराजे वारंवार मांडत आहेत.
 
"अलाहाबादच्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राजेंचा सत्कार केला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाच्या सर्व केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय नेत्यांनी उभं राहून त्यांचं अभिनंदन केलं. केंद्र सरकारच्या कोणत्याही मंत्र्याकडे गेले असता संभाजीराजे छत्रपती यांचा सन्मानच केला जातो."
 
भाजपाच्या राज्य सरकारने छत्रपती संभाजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली रायगड विकास परिषदेची स्थापना केली आणि त्या कामासाठी मोठा निधी दिला. अशी उदाहरणं देत भाजपने संभाजी राजे यांचा सन्मान कसा केला हे त्यांनी सांगितलं.