बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: पुणे , शुक्रवार, 18 फेब्रुवारी 2022 (21:32 IST)

वडेट्टीवार हे महाराष्ट्रातील कचरा; मराठा क्रांती मोर्चाची टीका

पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार स्वत:चे नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप मराठी क्रांती मोर्चाने पत्रकार परिषदेत केला.
 
मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राजेंद्र कोंढरे, धनंजय जाधव म्हणाले, वडेट्टीवार यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. संभाजीराजे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांनी दोन्ही हातात तलवारी घेऊन वार कोणावर करणार ? असे वादग्रस्त विधान केले आहे. वडेट्टीवार हे महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणात कचरा आहेत.
 
खासदार संभाजीराजे मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी येत्या २६ फेब्रुवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहेत. त्यास पुणे जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. मराठा क्रांती मोर्चाचे रघुनाथ चित्रे पाटील, बाळासाहेब आमराळे, नाना निवंगुणे, अमर पवार, गणेश मापारी, संदिप लहाने, श्रृतीका पाडाळे, द्वारकेश जाधव, रोहित भोसले उपस्थित होते.