शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. आरती संग्रह
Written By
Last Modified: मंगळवार, 4 ऑक्टोबर 2022 (15:28 IST)

रामाची आरती

shri ram stuti
नाना देही देव एक विराजे।
नाना नाटकलीला सुंदर रूप साजे।
नाना तीर्थी क्षेत्री अभिनव गति माजे।
अगाध महिमा पिंडब्रह्मांडी गाजे॥१॥
 
जयदेव जयदेव आत्मया रामा ।
निगमागम शोधीता न कळे गुणसीमा॥ध्रु.
 
बहुरूपी बहुगुणी बहुता काळाचा।
हरि-हर-ब्रह्मादिक देव सकळांचा।
युगानुयुगी आत्माराम आमुचा।
दास म्हणे महिमा न बोलवे वाचा॥२॥

जयदेव जयदेव आत्मया रामा ।
निगमागम शोधीता न कळे गुणसीमा॥ध्रु.
 
***********************************
 
स्वस्वरूपोन्मुखबुद्धि वैदेही नेली । 
देहात्मकाभिमाने दशग्रीवे हरिली । 
शब्दरूप मारुतीने सच्छुद्धि आणिली । 
तव चरणांबुजी येऊन वार्ता श्रृत केली । 
जय देव जय देव निजबोधा रामा ।। १ ।।
 
जय देव जय देव निजबोधा रामा । 
परमार्थे आरती, सद्भावे आरती, परिपूर्णकामा ।। धृ० ।।
 
उत्कट साधुनी शिळा सेतू बांधोनी । 
लिंगदेह लंकापुरी विध्वंसूनी । 
कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी । 
देह अहंभाव रावण निवटोनी ।। २ ।।
 
प्रथम सीताशोधा हनुमंत गेला । 
लंका दहन करुनी अखया मारिला । 
मारिला जंबुमाळी भुवनी त्राहाटिला । 
आनंदाची गुढी घेऊनिया आला ।। ३ ।।
 
निजबळे निजशक्ति सोडविली सीता । 
म्हणुनी येणे झाले अयोध्ये रघुनाथा । 
आनंदे ओसंडे वैराग्य भरता । 
आरती घेऊनी आली कौसल्यामाता ।। ४ ।।
 
अनाहतध्वनि गर्जती अपार । 
अठरा पद्मे वानर करिती भुभुःकार । 
अयोध्येसी आले दशरथकुमार । 
नगरीं होत आहे आनंद थोर ।। ५ ।।
 
सहजसिंहासनी राजा रघुवीर । 
सोऽहंभावे तया पूजा उपचार । 
सहजांची आरती वाद्यांचा गजर । 
माधवदास स्वामी आठव ना विसर ।। ६ ।।