Rice pack राईस पॅक लावा, टॅन घालवा
ऋतू कोणताही असला तरी टॅनिंगचा धोका असतोच. सूर्यप्रकाशातील अतीनील किरणांमुळे त्वता टॅन होतो, अकाली सुरकुत्या पडतात. यावर उपाय म्हणून घरगुती फेस मास्क बनवता येईल.
साहित्य : अर्धी वाटी शिजवलेला भात, तीन छोटे चमचे हळद पावडर, दोन चमचे मीठ, एक चमचा दही, एक चमचा मध.
कृती : एका बाऊलमध्ये शिजवलेला भात घ्या. त्यात एक चमचा मध घाला. भातात हळद पावडर, मीठ आणि दही मिसळून मिश्रण एकजीव करा. पॅक लावताना हे पेस्ट स्वरूपातलं मिश्रण चेहरा आणि मानेवर लेपस्वरूपात लावा. या मिश्रणाचा जाड थर लागायला हवा. साधारणत: दहा ते पंधरा मिनिटांनंतर लेप पूर्णपणे सुकेल. त्यानंतर गरम पाण्याने रगडून लेप काढून टाका. आठवड्यातून चार वेळा हा लेप लावल्यास टॅनिंगपासून मुक्ती मिळेल. तांदळात चांगल्या मात्रेत अॅण्टिऑक्सिडंट तत्त्वं असतात. या गुणधर्मामुळे त्वचेतील कोलाजेनची पातळी वाढते. त्यामुळे त्वचेची लवचिकता वाढते. या पॅकमध्ये आपण हळदीचा वापर करतो. हळदीमधील गुणतत्त्वांमुळे त्वचेवरील घातक जीवाणू आणि विषाणूंचा बंदोबस्त होतो. सहाजिकच त्यामुळे त्वचासंसर्ग कमी होण्यास मदत होते.
चेहर्यावरील मुरूमांचे डाग, डोळ्याखालील काळी वर्तुळं नाहिशी होतात. हळदीमुळे चेहरा चमकण्यासही मदत होते. मीठामधील व्हिटॅमिन सी मुळे टॅनिंगपासून मुक्ती मिळते. मधातील अमिनो अॅसिडमुळे त्वचेतील आर्द्रता टिकून राहते. चेहर्यावर चमक येण्यासही मदत मिळते. हा पॅक नियमित लावल्यास त्वचेचा वर्ण उजळतो.