शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. »
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा
  4. »
  5. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By श्रुति अग्रवाल|

पुरूषांची पिटाई करणारा 'गणगौर उत्सव'

WD
श्रद्धा आणि अंधश्रद्धाच्या या भागात आम्ही आपल्याला एक वेगळीच प्रथा दाखविणार आहोत. ही प्रथा धार्मिक तर आहेच, पण गंमतीदारही आहे. मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात पुंजापूरा गावात चैत्री नवरात्र अर्थात गणगौर उत्सव साजरा केला जातो. नऊ दिवसाच्या या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी मात्र एक आगळी वेगळी प्रथा पाळली जाते.

या प्रथे अंतर्गत एका उंच खांबाच्या टोकाला गुळाची एक पुडी बांधली जाते. मग गावातल्या महिला या खांबाभोवती उभ्या रहातात. त्यांच्या हातात झाडाच्या काठ्या असतात. गावातल्या युवकांचा गट या खांबावरील गुळाची पुडी काढण्याचा प्रयत्न करतो. पण या महिला त्या युवकांना हातातल्या काठ्यांनी चांगलाच चोप देतात. हे युवक या मारापासून वाचण्याचा प्रयत्न करतात. तरीही महिला काही त्यांना सोडत नाहीत.

WD
सात वेळा असेच होते आणि सातही वेळा या युवकांची चांगलीच धुलाई केली जाते. मग हा युवकांचा गट हा खांबच उखडून काढण्याचा प्रयत्न करतो. पण तेव्हाही त्यांना मार खावा लागतो. खांब ज्या खडड्यात रोवलेला असतो, तो खड्डा भरतानाही बिचारे युवक मार खातात.

यानंतर मग सर्व महिला आणि पुरूषांचा सामूहिकरित्या नाच-गाण्यांचा कार्यक्रम होतो. महिला आपले सौभाग्य कायम राहावे यासाठी देवीकडे प्रार्थना करतात. त्यानंतर मातेच्या मूर्तीला घराघारंत फिरवले जाते आणि ओटी भरण्यात येते.

WD
या अजब प्रथेमागचे कारणही आगळे आहे. वर्षभर पुरूष बायकांना त्रास देत असतात. तरीही या महिला आपल्या पतीसाठी गणगौर पूजन करतात. म्हणूनच या दिवशी वर्षभर महिलांना दिलेल्या त्रासाचं प्रायश्चित्त म्हणून पुरूष त्यांच्या हातून मार खातात.

या कार्यक्रमात पंचक्रोशीतील अनेक गावांचे लोक सहभागी होतात. महिलांमध्येही देवीचाच अंश आहे आणि त्यांना त्रास देणे योग्य नाही, याची जाणीव यानिमित्ताने होते, असे पुरूष सांगतात. या अनोख्या प्रथेविषयी आपल्याला काय वाटते? आम्हाला जरूर कळवा.