शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. »
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा
  4. »
  5. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By श्रुति अग्रवाल|

आदिवासींचा 'गळ उत्सव'

WDWD
श्रद्धा आणि अंधश्रद्धाच्या या भागात आम्ही आपल्याला मध्य प्रदेशातील माळवा परिसरातील आदिवासींची एक आगळीवेगळी पण तितकीच भयानक वाटेल अशी प्रथा दाखविणार आहोत. आदिवासी समाज रावणाचा मुलगा मेघनाथला अतिशय मानतो. मेघनाथ महाराज त्यांच्यासाठी देवाच्या जागी आहे.

त्यामुळेच त्याच्याकडे केलेला नवस पूर्ण होतो, अशी त्यांची श्रद्धा आहे. या नवसपूर्तीनंतर शरीराला गळ अडकवून स्वतःला त्रास करून घेण्याची परंपरा म्हणजे गळ उत्सव. नवस पूर्ण झाला की हे आदिवासी आपल्या शरीरात लोखंडी गळ (हूक) रूतवतात आणि गोल फेऱ्या मारतात. असे करणाऱ्यांना स्थानिक भाषेत पडियार म्हणतात. गळ शरीरात अडकवणे अतिशय वेदनादायी असते. तरीही परंपरेच्या नावाखाली हे टिकून आहे.

आपल्याला मुळीच यातना होत नाहीत असे हे पडियार सांगतात. भंवर सिंह यांनी गेल्या वर्षी येथे मुलगा होण्यासाठी नवस केला होता. वर्षभरात त्यांना मुलगा झाला. आमच्यासमोर ते गळ रूतवून घेत मेघनाथ महाराजांचे आभार मानत होते.
  कित्येक वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे, यावर सगळ्यांचे एकमत आहे. या परंपरेपूर्वी सुरुवातीला पडियार भरपूर दारू पितो.      

या परंपरेला केव्हा आणि कशी सुरुवात झाली? याबद्दल कोणालाही फारशी माहिती नाही. पण तरीही कित्येक वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे, यावर सगळ्यांचे एकमत आहे. या परंपरेपूर्वी सुरुवातीला पडियार भरपूर दारू पितो. नशेत असल्यामुळे पाठीत लोखंडी गळ टोचत असल्याचे त्याच्या लक्षात येत नसावे.

पंकज सिंह नावाचा पडियार दरवर्षी या परंपरेत सहभागी होतो. आपल्याला कोणत्याच प्रकारच्या यातना होत नसल्याचे तो सांगतो. हा आमच्या श्रद्धेचा विषय असून त्याबाबतीत इतर प्रश्नच निर्माण होत नाहीत, असे त्याचे म्हणणे आहे.

WDWD
गळ अडकवण्यापूर्वी पडियारच्या पाठीवर हळद लावली जाते. त्यांच्या पाठीत खोलवर जखमा होऊन त्यातून रक्तही येते. त्यामुळे व्यक्तीला संसर्गजन्य रोगही होऊ शकतात असे डॉक्टर सांगतात. पण आदिवासींच्या मते ही आमची परंपरा आहे. ती आम्ही थांबवू शकत नाही. या प्रथेबद्दल तुमचे मत काय ते आम्हाला जरूर कळवा.
फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा....