शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा
  4. »
  5. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By श्रुति अग्रवाल|

भूतबाधेतून मुक्त करणारी टेकडी

ShrutiWD
रडण्या-ओरडण्याचे आवाज, हुंदक्यांचे तीव्र ध्वनी, कर्कश आरडाओरडा नि आसमंत भारून टाकणारे चित्कार. जावरच्या हुसेन टेकडीचे हे दृश्य. कधीही गेलात तरी हे दृश्य बदलणार नाही. कारण हे आवाज आहेत, भूतांनी पछाडलेल्या माणसांचे. आणि ही भूते उतरवण्यासाठी ही टेकडी प्रसिद्ध आहे. या टेकडीविषयी खूप काही ऐकले होते, म्हणून तिकडे जाण्याचे आम्ही ठरविले. वेळ होती सकाळचे सात. टेकडीच्या प्रवेशद्वारापाशी आलो तेव्हाच आम्हाला वेड्यासारख्या हालचाली करणार्या दोन बायका दिसल्या. यमुनाबाई व कोसर बी. अरे बाबा रे........ म्हणत चित्रविचित्र आवाज त्या काढत होत्या. त्यांचे ओरडणे भीतीदायक होते.

त्यांच्याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही यमुनाबाईच्या पतीलाच बोलते केले. त्याने सांगितले, की गेल्या अनेक दिवसांपासून यमुना विचित्र वागत होती. मग गावातल्या फकिराकडे गेलो. त्याने सांगितले, की तिच्यावर हडळीची बाधा झाली आहे. तिला हुसेन टेकडीवर न्या. मी दोन आठवड्यांपूर्वी तिला येथे घेऊन आलो. तिला धागा बांधण्यात आला आहे. पाच वेळा येथे आलो तर ती बरी होईल असे वाटते.

फोटो गॅलरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

त्याच्याशी बोलल्यानंतर आम्ही हजरत इमाम हुसैनच्या रोज्यात सामील झालो. तेथील अगदी चक्रावून टाकणारे. जिकडे तिकडे पहावे तिकडे भूताखेतांनी पछाडलेल्या महिला ओरडत होत्या. डोके आपटत होत्या. तापलेल्या फरशीवर लोटांगण घालत होत्या. त्यांचे ओरडणे सुरूच होते. काही माणसांना बेड्यांनी बांधले होते. ती हुंदके देत होती. हे असे का चालते हे जाणून घेण्यासाठी आम्ही टेकडीचे कार्यकारी अधिकारी तैमूरी साहेब यांच्याशी संपर्क साधला.

ShrutiWD
त्यांनी सांगितले की, कोणत्याही भूतप्रेत बाधित लोकांना येथील पाण्याने आंघोळ घातली जाते. त्यानंतर येथे असलेल्या जाळीवर एक धागा बांधला जातो. दुसरा त्या पीडीत व्यक्तीच्या गळ्यात बांधला जातो. हा धागा गळ्यात बांधल्यानंतर त्यांच्या अंगात येते व ते झिंगायला लागतात. त्यानंतर या लोकांना येथीत तलावात अंघोळ घातली जाते.


आपल्याला काय वाटत भूत प्रेत यांचे अस्तित्व आहे का? यावर आपले मत नोंदवा
ShrutiWD
हे ऐकल्यानंतर आम्ही तो तलाव बघण्यासाठी गेलो. तेथील वातावरण सहन होण्यापलिकडचे होते. तलावात अत्यंत घाणेरडे पाणी होते. सर्व ठिकाणचे सांडपाणी तेथे येऊन मिसळत होते. मानसिकदृष्ट्या आजारी दिसणारे लोक या पाण्यात आंघोळ करत होते. काही जण तर गुळण्या देखिल करताना दिसले. ते पाहतानाच किळस आली.

या घाणेरड्या पाण्यातील आंघोळीने हे लोक बरे होण्याऐवजी आजारी पडण्याचीच शक्यता जास्त होती. पण एवढा विचार करण्याएवढा वेळ त्यांच्याकडे अजिबात नव्हता. या पाण्यात आंघोळ करणार्या सकिना नावाच्या मुलीला विचारले, तुला काय त्रास आहे, तू इथे का आंघोळ करतेय. त्या मुलिने निरागसपणे उत्तर दिले. माझ्या आईवर हडळची सावली पडली आहे. माझ्यावरही ती पडू नये म्हणून इथे आंघोळ करत आहे. एवढे सांगून तिने पुन्हा त्या पाण्यात डुबकी मारली. मग आम्ही सकिनाच्या आईशी बोललो. तिला विचारले या पाण्याने सकिना आजारी पडली तर? यावर 'चार वर्षांत ती आजारी पडली नाही' हे तिचे उत्तर ऐकून आम्ही सुन्न झालो.

ShrutiWD
तेवढ्यात कळले की सकाळची पहिली धूपारती आता होणार आहे. हे समजताच लोकांची धावपळ सुरू झाली. मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली. भूतबाधा झालेले लोक तेथे आले होते. ते घुमत होते. विचित्र आवाज काढत होते. धूपारतीस सुरवात झाली आणि घुमणारे लोक अचानक पडण्यास सुरवात झाली. याचे कारण काय असे एकाला विचारले असता, या लोकांवर असाच इलाज केला जातो, असे उत्तर मिळाले. या लोकांना सकाळ- संध्याकाळ धूप देणे खूप जरूरीचे आहे, अशी माहितीही त्याने पुरवली.

इलाजाची ही विचित्र पद्धत पाहिल्यानंतर आम्ही तेथील मुतवल्ली नवाबाशी बोललो. त्यांचे म्हणण्यानुसार, आमच्या येथे कोणीही तांत्रिक मांत्रिक नाही. जे काही होते आहे ते हुसेन साहेबांच्या मर्जीनुसार. घाण पाण्यातील आंघोळ व लोकांना साखळदंडांनी बांधण्याला ते देवाने भूतांना दिलेली शिक्षा समजतात. त्यांच्या मते माणसाला कुठलाही त्रास होत नसतो. केवळ त्याच्यावर भूतप्रेतादींच्या सावल्या परिणाम घडवतात.

ShrutiWD
आम्ही पूर्ण दिवस हुसेन टेकडीवर घालवला.तेथे आलेल्या अनेकांशी चर्चा केली. यातील अनेकांनी सांगितले की हुसेन टेकडीवर त्यांची अतूट श्रद्धा आहे. या श्रद्धाळूंमध्ये हिंदू व मुसलमान दोन्ही धर्मीय होते. बरेच जण नवसपूर्तीनिमित्त तुलादान करत होते. अशाच पवन नावाच्या व्यक्तीने सांगितले की, मी आज जो काही आहे तो बाबा साहेबांच्या आशीर्वादाने. त्यांनी मला भरभरून धनसंपत्ती दिली आहे. आता फक्त आपल्या आजारी मुलावर बाबांची कृपा व्हावी एवढीच इच्छा आहे.
ShrutiWD
येथे येणार्यांमध्ये महिलांचे प्रमाण जास्त आहे. ह्या सर्व खालच्या स्तरावरील आहेत. काही लोक सुशिक्षित असूनही भूतप्रेत, जादूटोणा यावर विश्वास ठेवत होते. इरफान नावाचा एक विद्यार्थी असाच. तो अमेरिकेत शिकत होता, परंतु, जादूटोण्यामुळे बर्याच कालावधीपासून येथेच रहात होता. दिवसरात्र प्रार्थना करत होता. हुसेन साहेबांच्या नावाने जप करत होता. त्याच्या म्हणण्यानुसार त्याला येथे मनःशांती मिळते आहे.

हुसेन टेकडीवरील या सार्या चित्रविचित्र घटना पाहून आमची झोप उडाली. यासंदर्भात दुसर्या दिवशी मनोविकारतज्ज्ञांशी संपर्क साधला. मानसिक स्थिती बिघ़डल्यावर कोणीही व्यक्ती स्वतःच्या शरीराला एवढा त्रास करून घेऊ शकते का? असा प्रश्न डॉ. दीपक मंशा रमानी यांना विचारला. ते म्हणाले, की मानसिक संतुलन बिघडले असेल तर तो स्वतःला त्रास करून घेतो. आत्म्याने झोडपण्याला आम्ही वैद्यकीय भाषेत हिस्टेरिया असे म्हणतो. या अवस्थेत माणूस वेड्यासारखा घुमत रहातो. याचप्रमाणे सीडोसीरस नावाचा एक आजार आहे, ज्यात असेच झटके येतात. त्याचप्रमाणे काही लोक एकदम गप्प होतात. अशा आजारांचा उपचार आम्ही रूग्णांशी बोलून, त्याची मानसिक स्थिती ढासळण्याचे कारण शोधून करतो.

ShrutiWD
अशा रूग्णांचा उपचार वास्तविक साध्या पद्धतीने करता येतो. भूतप्रेत वगैरेंवर खालच्या स्तरातील लोकांचा जास्त विश्वास असतो. ही मंडळी अजूनही शंभर वर्षापूर्वीच्या जुनाट कल्पनांमध्ये जगत आहेत. त्यांच्यापर्यंत वैद्यकीय सुविधा पोहचणे जरूरीचे आहे. तांत्रिक-मांत्रिकांकडून केल्या जाणार्या उपचारामुळे अशा व्यक्ती पूर्णपणे वेड्या होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

एकीकडे विज्ञान व दुसरीकडे लोकांचा अंधश्रद्धा या एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटतात. परंतु, अशा प्रकारच्या हुसेन टेकड्यांबाबत प्रशासनाची उदासीनता हा मोठा चिंतेचा विषय आहे.

वाचा नवीन कथा प्रत्येक मंगळवारी....