सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. आज-काल
  3. ब्लॉग-कॉर्नर
Written By
Last Updated : मंगळवार, 12 मे 2015 (10:22 IST)

सही, सही आणि सही

सही रे सही या नाटकात एका साध्या, छोट्या, क्षुल्लक अशा सहीवरुन केवढे मोठे नाट्य घडते बघा. मी तर असेही वाचले की त्या नाटकाबाहेरही बरेच नाट्य घडले म्हणून. पण असो तो आपला विषय नाही पण एक गोष्ट मी तुम्हाला निर्विवाद सांगू शकतो कुठल्याही नाट्याला जर कोणी कारणीभूत असले तर ती आहे सही. जसे दोन पुरुषांच्या वादामागे एक स्त्री असते ना तसेच त्यांच्या आयुष्यात घडणार्‍या नाट्याच्या मागे सही असते. बर सहीवरुन नाट्य घडायला तुम्ही कोणी मदन सुखात्मे किंवा त्याचे वंशजच असायला हवे असे काही नाही. तुम्ही कोण्या बुद्रुकवाडीचे दगडू धोंडे पाटील जरी असलात तरीही तुमच्या आयुष्यात सहीवरुन नाट्य घडू शकते कारण सहीची ताकतच अशी आहे की ती अच्छे अच्छोकी बोलती बंद कर देती है. अगदी सफाइने खोट बोलणार्‍याला म्हणा ‘बाबारे तू जे बोलतोय ना ते सारे एका कागदावर सही करुन लिहू दे’ नाही त्याची दातखिळी बसली तर सांगा. या देशात धादांत खोटे बोलणारी माणसे दोनच एक राजकारणी आणि दुसरा साडीच्या दुकानातला सेल्समन. तुम्ही त्यांच्यापैकी कुणावरही हा प्रयोग करुन पहा, माझ्या म्हणण्याची प्रचिती नाही आली तर कळवा. इमेल एसएमएस काहीही करा.
 
हिंदी चित्रपटांच्या लेखकांना या सहीमुळे केवढा फायदा झाला बघा, तो लेखक कसलेही डोके न लावता चित्रपटाचा शेवट या सहीमुळे अगदी सहीसकट सहज लिहीतो. साधारणतः साऱ्याच चित्रपटातले दृष्य सारखेच असते. ती त्या विलेनची धमकी ‘बुढ्ढे तू उस कागजपे साइन कर दे वरना.’ पुढे काहीही असू शकते कधी कोणाचे तुकडे तुकडे करायचे तर कधी कुणाला जिवंत गाडायचे तर कधी उकळत्या तेलात फेकून द्यायचे. हल्ली त्यातही बरेच इनोव्हेशन आणि क्रिएटीव्हीटी आलेली आहे. लोक कशा कशात इनोव्हेशन करतील काही सांगता येत नाही आमच्यासाठी तर ते संडासतले फॉसेटच फार मोठे इनोव्हेशन होते. सार कस ऑटोमेटीक, असो. विलेनची ती धमकी ऐकून मग तो जर्जर म्हातारा थरथरत्या हातात पेन घेउन त्या कागदावर सही करणार तेवढ्यात हिरोची दिमाखात एंट्री, मग ती लुटुपुटुची लढाइ, विलेनची हार, हिरोचा विजय आणि शेवटी पोलीसांची सारवासारव. पोलीस गेल्यावर चित्रपटातला सर्वात महत्वाचा प्रसंग हिरोइनने त्या हिरोला गळे काढत मिठ्या मारणे. तो सीन बघितला की मग आपणही पैसे वसूल झाले म्हणून जोरजोरात शिट्या मारत थेयटर सोडतो कुठेतरी मनात आशा असते कधीतरी कुणीतरी अशीच सुंदर मुलगी आपल्याही मिठ्या मारेल म्हणून. स्वप्न बघायला पैसे पडत नाहीत हो. जरा विचार करा त्या हिरोची एंट्री व्हायच्या आधी जर का म्हाताऱ्याची सही करुन झाली असती तर काय झाले असते. मी तुम्हाला स्टँपपेपरवर सही करुन लिहून देतो त्या हिरोइनने आता हिरोएवजी त्या विलेनला मिठ्या मारल्या असत्या. अरे ती सही व्हायची थांबली म्हणून तो कालचा पोरगा, ज्याच्यावर कालपर्यंत रस्त्यावरच काळं कुत्रही भुंकत नव्हत, आज अचानक हिरो झाला. चांगल्या चांगल्या हिरोइनला मिठ्या मारायला लागला. सारी सहीची करामत.
 
आता म्हणे सहीएवजी बायोमेट्रीक की काय असा प्रकार येणार आहेत. त्यात ते तुमच्या बोटांचे ठसे, डोळ्याचा रॅटीना स्कॅन किंवा ह्रदयाचा स्कॅन वगेरे असले काहीतरी घेणार आहेत म्हणे. मागे ते आधार कार्ड आले होते त्यातही असलाच विचित्र प्रकार होता. शेवटी जे व्हायचे तेच झाले दोनच वर्षात ते आधार कार्ड निराधार झाले. अरे तुम्ही सहीचा आधार काढायला जाल तर तुमचा आधार राहील का? ही सहीच तर तुमची ओळख आहे. सहीची सर त्या बायोमेट्रिकला येनार आहे का? आठवा दिवारमधला तो दोन भावांमधला जागतिक ख्यातीचा अजरामर संवाद. हो जागतिक ख्यातीचाच, उद्या कुण्या हॉलीवूडच्या चित्रपटात सुद्धा जॉर्ज क्लूनी हेच वाक्य ब्रॅड पिटला ऐकवित असेल. ‘जाओ पहले उस आदमी का साइन लेके आओ जिसने मेरे हाथपे ये लिख दिया था के मेरा बाप चोर है. उसके बाद मेरे भाई तुम जो कागजपे बोलोगे उस कागजपर मैं साइन करनेको तयार हू.’ आता हाच संवाद जरा त्या बायोमेट्रीकचा आधार घेउन लिहायचा झाला तर कसा होइल. ‘जाओ पहले उस आदमी का अंगूठा लेके आओ जिसने मेरे हाथपे ये लिख दिया था के मेरा बाप चोर है. उसके बाद मेरे भाई तुम जो कागजपे बोलोगे उस कागजपर मैं अंगूठा लगानेको तयार हू.’ कसे वाटेल ते, असे काही ऐकणे म्हणजे बिर्याणीतला मसाला काढून त्याला तुप जिऱ्याची फोडणी देण्यासारखे आहे. खरच कोणी सलीम जावेद असल्या प्रकारचा संवाद लिहायला धजेल का? तेंव्हा सहीला आव्हान देणे म्हणजे आजपासून घरात माझी सत्ता आहे असे बायकोला सांगण्यासारखे आहे. ती ऐकणार आहे का? किंवा रिक्षावाल्याला लेन कटींगचा नियम समजावून सांगण्यासारखे आहे. तो समजून घेणार आहे का?
 
सही ही चार प्रकारची असते मालदार सही, वजनदार सही, भानगडीची सही आणि अतिसामान्य सही. ज्या सहीमुळे माल मिळतो ती सही म्हणजे मालदार सही. म्हणजे आता बघा तुम्ही पन्नास रुपयाला एक साधी फडतूस बॅट घ्या. त्या बॅटवर सचिन तेंडुलकरची सही घ्या. रीटायर्ड झाला म्हणून काय झाले आपण देव बदलत नसतो. तीच बॅट तोच दुकानदार तुमच्याच कडून पन्नास हजार रुपयाला विकत घेइल बघा. असा माल मिळवून देणारी सही म्हणजे मालदार सही. मालदार सहीचे दुसरे उदाहरण म्हणजे चित्रकाराची सही. माझ्यासारख्या अतिसामान्य बुद्धिच्या कलादरीद्री माणसासाठी ते मॉडर्न पेंटींग वगेरे म्हणजे मुलाचा पाय लागून सांडलेले रंग आणि त्यावर मारलेल्या उभ्या आडव्या रेषा. तरी त्या पेंटींगची किंमत मिलियन्स ऑफ डॉलर्स मधे असते. आता जर का त्याच पेंटींगवर त्या कोण्या मोठ्या चित्रकाराएवजी खालच्या आळीतल्या देशपांडे वकीलाने सही केली तर खरच कोणी त्यासाठी मिलियन डॉलर्स मोजनार आहे का? गपचुप त्याच्या हातात ऍफेडिव्हेटचे वीस रुपये टिकवून त्याला कटवतील. त्याचमुळे माझे असे मत बनले आहे की ती किंमत जी आहे त्या पेंटींगवर कोण सही करतो त्याच्यासाठी आहे. सहीमुळे असे धबाड मिळते म्हणूनच ते चित्रकार लोक त्या सहीला दागिण्यांनी मढवतात, फुलांनी सजवतात, बिंदी लावतात, वर एक छोटीसी टिकली सुद्धा लावतात. नाहीतर आमची सही बघा. दागिण्यांनी मढवणे तर सोडा आम्ही तिला धड कपडे सुद्धा घालीत नाहीत. सही नावाच्या अशा या ताकतवर स्त्रीकडे आमच्यासारखे वेंधळे अति सामान्य पुरुष नेहमीच दुर्लक्ष करतात. या मोठ्या लोकांच्या दागिण्यांनी मढवलेल्या, फुलांनी सजवलेल्या, चांगल्या नटवलेल्या सहीसमोर आमची सही म्हणजे म्हणजे पांढऱ्या गोठोड्यात गुंडाळून तिरडीवर बांधलेल्या प्रेतासारखी वाटते.
 
साहेब तुमचे सगळे काम झाले आहे फक्त मोठ्या साहेबांची सही तेवढी राहीली आहे हे वाक्य ऐकले नाही असा भारतीय नागरीक सापडणे शक्य नाही. किंबहुना भारतीय नागरीक ओळखण्याची परीक्षा घ्यायची ठरवली तर वरील वाक्याचा खरा अर्थ काय असा प्रश्न त्यात विचारावा. ज्याला सांगता आला नाही त्याला बिनबाभोट नापास करावे. या देशातल शेंबड पोर पण त्याचा खरा अर्थ सांगून जाइल. ज्या अशा सहीशिवाय टेबलावरचा कागद पुढे सरकत नाही ती सही म्हणजे वजनदार सही. त्या सहीचे वजन त्या सही करनाऱ्याच्या वजनावर अवलंबून असते. त्या सहीच्या वजनानुसार मग तुम्हाला तेवढ्याच वजनाचे पैसे सरकावे लागतात मग हळूहळू तुमचा सरकारी कागद सरकू लागतो. वजनदार सहीचे दुसरे उदाहण द्यायचे झाले तर आता हे बघा. तुम्ही तुमच्या लग्नासाठी लाखो रुपये खर्च कराल, मोठा हॉल घ्याल, हजार पाचशे लोकांना जेवू घालाल तरीही कोणत्याही देशाच्या एम्बसीमधे त्याला मान्यता नाही. पण तेच आता एका दहा बाय दहाच्या खोलीत चार लोकांच्या साक्षीने फाइलच्या ढीगाऱ्यातल्या एका रजिस्टरवर सही करा. मग आहे कोणाची बिशाद तुमचा व्हीसा रिजेक्ट करायची. हल्लीच्या या जमान्यात दोन इंडीपेंडंट माणसे फक्त व्हीसाच्या वेळेलाच डीपेंडंट असतात बाकी त्या लग्नाच्या सर्टीफिकेटचा फारसा उपयोग नसतो.
 
जी सही केल्याने बँकेत पैसे नसूनही चेक वठवला जातो ती म्हणजे भानगडीची सही. नावाप्रमाणेच भानगडीच्या सहीमुळे भांडणे होतात पण त्याने भ्यायचे असे काही कारण नाही कारण जोपर्यंत खरा गुन्हेगार कोण आहे हे ठरते तो पर्यंत तुमच्या दोन तीन पिढ्या आरामात त्या सहीमुळे झालेल्या कमाईवर जगलेल्या असतात. उपयोगितेच्या दृष्टीकोनातून विचार करायचा झाल्यास भानगडीची सही पहिल्या क्रमांकावर येइल. जिवंत बापाचे ‘डेड सर्टीफिकेट’ आणणे किंवा मेलेल्या बापाचे त्याने न केलेले मृत्युपत्र त्याच्या सहीसकट आणणे, असलेली बहीण गाळणे किंवा नसलेली बहीण सिद्ध करणे, बॉसच्या नकळत साळ्याचे भानगडीच्या प्रॉपर्टीचे लोन मंजूर करणे किंवा बॉसने मंजूर केलेले शेजाऱ्याचे लोन नाकरणे अशी कितीतरी भानगडीच्या सहीची उपयोग सांगता येतील. असे असूनही भानगडीची सही ही काही कोण्या लेच्यापेच्या माणसाला जमनारी गोष्ट नाही. त्यासाठी प्रखर बुद्दीमत्ता, सफाइदार कला आणि मुख्य म्हणजे प्रचंड हिम्मतीची गरज लागते. वेळ पडल्यास भाकरी आणि पिठल्याचा आस्वाद घेत एक खुनी आणि एक दरोडेखोराच्या सोबतीने एका खोलीत आयुष्य काढायचीही तयारी ठेवावी लागते.

सौजन्य - मित्रहो 
https://mitraho.wordpress.com
भानगडीच्या सहीच्या अगदी विरुद्ध म्हणजे अतिसामान्य सही. जी सही केल्याने बँकेत पैसे असूनही चेक परत येतो ती म्हणजे अतिसामान्य सही. या अतिसामान्य सहीवर एक फार मोठ बंधन असते ते म्हणजे ही सही नेहमी एकसारखीच असली पाहीजे नाहीतर त्या अतिसामान्यांच्या गर्दीत तुम्ही कोण ते ओळखू येत नाहीत. सामान्य माणसाचे सारे आयुष्य मग ती अतिसामान्य पण वेगळी अशी सही करण्यात जाते, सुरवातीला तुम्हाला ती वेगळी अशी सही म्हणजे काय ते आधी शिकावे लागते आणि मग तशीच सही आयुष्यभर करावी लागते. मागे एकदा माझा चेक परत आला कारण काय, तर सहीला शेवटी दोन स्ट्रोक जास्त झाले म्हणे. आता सही करताना त्याला किती स्ट्रोक आहेत हे मोजून सही करायची का? त्या दिवसापासून मला चेकबुकवर सही करायची धास्तीच वाटते. एका चेकबुकामागे निदान दहा तर चेक मी सही चुकली म्हणूनच फाडून फेकतो. हे असे चेक फाडून संपूर्ण आयुष्यात मी एका झाडाचा जीव नक्की घेइल. चेकबुकवर सही करणारे माझ्यासारखे निदान लाखभर माणसे तरी सापडतील तेंव्हा या सहीमुळे उगाचच एक लाख झाडांना आपला जीव गमवावा लागत आहे. कोणामुळे कोणाचा जीव जाइल काही सांगता येत नाही.
 
मला जी सही बरोबर वाटते तशी सही केल्याने काम भागते का? नाही. दोनच दिवसांनी गोड आवाजात इंग्रजीमधून धमकीवजा फोन येतो
“सर तुमची सही मॅच होत नाही आहे एक तासाच्या आत बँकेत येउन खातरजमा करा.”
अस कुण्या दरोडेखोऱ्याला किंवा भ्रष्ट अधिकाऱ्याला पोलीस दोन दिवसात आत्मसमर्पण करायला सांगतात ना हा तसलाच प्रकार असतो. त्याला तरी दोन दिवसाची वेळ दिली जाते आम्हाला तर तासाभरात हाजीर व्हायचे आदेश येतात. तिथे बँकेत गेल्यावर दोन गोड मुलींसमोर सही करायची. ती सही काही भलतीच तिसरीच निघते ती ना ओरीजनल सोबत मॅच होत ना त्या चेकवर केलेल्या सहीसोबत मॅच होत. त्या दोन गोड मुली मग उगाचच त्यावर खल करतात, त्याच्या गोड इंग्रजीमधून ‘काय माणूस आहे साधी सही सुद्धा करता येत नाही, सही करता येत नाही तर बँकेत अकॉउंट काढतातच कशाला?’ असे काही म्हणत असतात. मला अजून दोन तीन सह्या करायला लावतात वेगवेगळ्या कागदावर सह्या करायला लावतात. अरे असे कागद नाहीतर पेन बदलून मुद्दलात काही फरक पडनार आहे का? प्रत्येक वेळेला सही ही वेगळीच. मग त्यांच्या लक्षात येते ही तर पार हाताबाहेर गेलली केस आहे मग ओळखपत्राची झेरॉक्स घेउन माझी त्या गोड छळवादातून सुटका होते. हे प्रकरण इतक वाढल की हल्ली बायकोला भलतेच संशय यायला लागले. तिलाही समजावून सांगावे लागते अरे बाबा एवढ स्कील नाही माझ्यात. उलट मला अशी शंका येते की एसीत बसून कंटाळा आला म्हणून काहीतरी भेजाफ्राय विरंगुळा म्हणून असे माझ्यासारख्याला छळण्याचा छंदच या मुलींना जडला आहे की काय?
 
माझाच काय बहुतेकांचा कॉलेज पूर्ण होइपर्यंत सहीशी तसा फारसा संबंध येत नाही माझाही तसा आला नाही. नाही म्हणायला स्कॉलरशीपसाठी सही करावी लागायची पण त्यावेळेला आमच्या सहीपेक्षा त्या रेव्हून्यू स्टँपची किंमत जास्त होती. खर सांगायचे तर ज्यावेळेला रेव्हून्यू स्टँप लावून सही घेतली जाते त्यावेळेला त्या माणसापेक्षा त्या रेव्हून्यू स्टँपची किंमत जास्त आहे असे समजावे. मी आधी मराठीत सही करायचो, मग इंग्रजीत सही करायला शिकलो. छान कॅपीटल लेटर मधे सारी अक्षरे सुटसुटीत लिहायचो. कोणी म्हणाले की असे रांगेत उभे केलेल्या मुलांसारखी सही करशील तर कोणीही तुझी सही कॉपी करु शकेल. तेंव्हा करस्यू रायटींग मधे सही करायला शिक. मी ते शिकून घेतले. मुळात माझे अक्षर म्हणजे मुंगळ्याच्या पायाला शाही लावून त्याला कागदावर सोडून दिल्यासारखे आणि आता ते करस्यू रायटींग म्हणजे आधीच मुंगळा (मर्कट) त्यात मद्य प्याला. माझ्या एका मित्राने सांगितले कोणी सहीवरुन त्या माणसाचा स्वभाव, भविष्य वगेरे सांगतो. त्याने सांगितले की जर सही वर जाणारी असेल तर तो मनुष्य आयुष्यात वर जातो. सहीखाली एक रेष ओढली असेल तर ती त्या व्यक्तीचा आत्मविश्वास दर्शविते. या साऱ्या गोष्टी ऐकून मी पण माझे भविष्य बदलण्यासाठी स्वतःची सही बदली. तिला तिरपी करुन वर वर नेली, आत्मविश्वास दाखवायला त्याखाली एक काय दोन दोन रेषा ओढायला लागलो. हे असे केल्याने भविष्य कितपत बदलले आणि आत्मविश्वास कितपत वाढला हे काही सांगता येनार नाही पण कदाचित त्या सहीचा परिणाम की काय माझा वरचा मजला भरुन राहीला (निदान मी तरी असे मानतो), राहायला घरही वरच्या मजल्यावरच मिळाले.
 
कॉलेज संपल्यावर मी पहीले काम कुठले केले असेल तर ते होते पासपोर्ट बनविण्याचे. माणसाच्या स्वप्नांच्या भरारीचे काही सांगता येत नाही, उगाचच आशा आपली. त्यावेळेला जशी करता येत होती तशी सही मी त्या पासपोर्टवर केली आणि विसरुन गेलो. पुढे जाउन ही सही गोचीड जसे बैलाच्या पाठीला चिकटते तशी आयुष्यभर मला चिकटणार आहे आणि रक्त काढल्याशिवाय काही ती बाहेर येणार नाही याची त्यावेळेला तरी काही कल्पना नव्हती. एक साध्या सहीमुळे मनस्ताप व्हायला आमच्या बापजाद्याने काही आमच्या मागे गडजंग इस्टेट वगेरे ठेवली नव्हती. काही वर्षे गेली मी मुंबईला नोकरीला लागलो. बँकेत अकाउंट उघडायची गरज पडली तेंव्हा माझे ओळखपत्र म्हणून मी पासपोर्ट दिला. तोच पासपोर्ट माझ्या सहीचा पुरावा म्हणून वापरल्या जाणार होता. मी त्या बँकेच्या फॉर्मवर पण मला जमेल तशी सही केली. दुसऱ्याच दिवशी बँकेचा मनुष्य फॉर्म घेउन परत आला.
“सर सही मॅच होत नाही” मी निरखून बघितले तो म्हणत होता ते खरे होते.
“खरे आहे. आता वयोमानानुसार सही बदलतेच ना त्यात काय मोठे एवढे.”
“नो सर सही तशीच पाहीजे, पासपोर्टवर आहे अगदी तशी.”
आता आली ना पंचाइत. एक तर आमचे अक्षर असे दिव्य, त्यात त्या पासपोर्टवर करस्यू रायटींग मधे केलेली इंग्रजी सही. एकवेळ एकदा काढलेली चांगली अक्षरे परत तशीच काढता येइल पण एकदा केलेली घाण परत तशीच करता येत नाही हो. शेवटी घाण ही घाणच ती अशी केली का अन तशी केली का काय फरक पडनार आहे? माझे हे लॉजिक समजून घेण्याइतपत त्या बँकवाल्याची बुद्धी नव्हती. तो एकच री ओढत होता तशीच सही पाहीजे आणि मी त्या सहीची प्रॅक्टीस करण्याच्या नादात कागदावर कागद फाडीत होतो. शेवटी माझे लक्ष त्या पासपोर्टवरील फोटोकडे गेले. मी परत एकदा प्रयत्न करायचे ठरविले.
“का हो हा फोटो तुम्हाला आयडी प्रूफ म्हणून चालतो का?”
“हो”
“आता तर मी तसा अजिबात दिसत नाही तरी तो तुम्हाला चालतो मग ही सही का चालत नाही. माणसाचा चेहरा बदलू शकतो, त्याची उंची वाढू शकते, त्याचे शरीर वाढू शकते पण सही तशीच हवी हा अट्टहास का?” हे वेगळे सांगायला नकोच की माझा हा युक्तीवादही फसला. त्या दिवसापासून ते आजतागायत मी माझ्या तारुण्यात केलेली घाण परत तशीच करण्याच्या नादात रोज त्या झाडाचा गळा दाबत असतो.
 
अशी ही सहीची दुनिया आणि किमया. त्यातही काही सह्या अशा असतात की ज्या फ्रेम करावाशा वाटतात, ती फ्रेम दिवाणखान्यात टांगाविशी वाटते, त्या सहीसमोर रोज नतमस्तक व्हावयसे वाटते. त्या फ्रेमकडे बघितल्याने एक वेगळीच प्रेरणा मिळते, आयुष्याला एक दिशा मिळते. अशा साऱ्या सह्यांना माझा साष्टांग प्रणिपात.
सौजन्य - मित्रहो 
https://mitraho.wordpress.com/