बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. ब्लॉग-कॉर्नर
Written By वेबदुनिया|

उगाच नव्हे आवर्जून भेट द्यावा असा ब्लॉग

PRPR
बंगलोरला रहाणाऱ्या अजित ओकचा ब्लॉग म्हणजे खमंग, खुसखुशीत, मनोरंजक, माहितीवर्धक, काव्यरसास्वाद असा सारा साहित्यिक कोलाज आहे. त्याच्या ब्लॉगचं नाव जरी उगाच उवाच असलं तरी हे लेखन उगाचच केलेलं अजिबात जाणवत नाही. कारण त्याला चांगलं साहित्यमुल्यही आहे.

आयटी क्षेत्रात काम करत असणाऱ्या अजितच्या साहित्य जाणीवाही चांगल्या प्रगल्भ आहेत. शिवाय त्याला लिखाणाची ही विशेषतः खुसखुशीत चांगली शैली आहे, हे या ब्लॉगवरील नोंदी पाहिल्यावर आवर्जून जाणवतं. ब्लॉग साधारणपणे कथा, कविता, खुसखुशीत लेख, टीका, प्रवासवर्णन, ललित आणि व्यक्तिचित्रणात्मक लेख अशा लिखाणात विभागला गेला आहे.

यात खसखसमध्ये ४१ म्हणजे सर्वांत जास्त लेख आहेत. (काही लेख इतरही विभागांमध्ये आहेत.) यातल्या चकली या लेखात मातोश्रींना न जमणाऱ्या चकलीवरचं कवित्व चकल्यांइतकंच खुसखुशीत आहे. त्याचा थोडा मासला पाहू.

प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते; ती वेळ आल्याखेरीज काही होत नाही म्हणतात। चकल्यांचेही असंच असावं। प्रत्येक भाजणीची एक वेळ असते। उत्तम भिजवून त्यात (प्यारे) "मोहन" घालून, त्याहून छान वर्णन सांगून चकल्या पाडल्या की तुकडे तयार! मग आमची आई "या वर्षी तांदूळच कसा बरोबर नव्हता (म्हणजे गेल्या वर्षीसारखाच) " पासून ते "पावसाची लक्षणं ना बाहेर आज?" वरुन "सो-या जरा जास्तचा घट्ट बसलाय आज" ते "राजकीय अनिश्चितता आहे ना आफ्रिकेत" अशी सगळी कारणमीमांसा देते.

चकलीच्या या आस्वादावरूनच अजितच्या खुसखुशीत लेखनशैलीची कल्पना यावी. माझा नावडता ऋतू हा पावसाळ्यावर लिहिलेला लेख भन्नाट. पावसाळा आवडत नाही यासाठी दिलेल्या कारणांपैकी `पावसाळ्यात मला सर्दी होते. सर्दीवर अजून कुठलेच औषध सापडलेले नाही. सर्दी मला आवडत नाही. विशेषतः नाक चोंदले की तोंडाने श्वास घ्यावा लागतो. ते आवडत नाही` अशी कारणे वाचताना तुमच्या चेहऱ्यावर मिस्किल हास्य उमटल्याशिवाय रहाणार नाही. धुम-2 या चित्रपटाचे परीक्षण लिहितानाही अजितची लेखणी सुसाट सुटली आहे. त्यातल्या कंसातल्या कॉमेंट तर भन्नाटच. त्याच्या खुसखुशीत सदरात काही किस्सेवजा गमतीदार छोटेखानी स्फुटेही वाचण्यासारखी आहे. भाषेतल्या गमतीजमती सांगताना अजित म्हणतो, आपल्याला जर कोणी 'डोळा मारला' तर मग आपल्याला [तो] 'डोळा लागतो' का?. काय पटलं ना.

ललित सदरात अजितने लिहिलेला गिन्न्या हा लेख वाचकांना नक्कीच त्यांच्या बालपणात घेऊन जाईल. लहानपणी अनेकांना वेगवेगळे छंद असतात. अजितला काड्यापेट्यांवरची कव्हर जमा करण्याचा छंद होता. त्याला गिन्न्या म्हणतात. त्या गोळा करण्याचा आटापीटा, त्यांची साठवणूक आणि एकेदिवशी हरवलेली गिन्न्यांची पिशवी. हे सारं वाचताना उगाचच हुरहुर लागून जाते. नकळत आपण आपल्या बाळपणात जातो. असा कातर बनलेला आपला मूड नंतरच्या रविवार दुपार या खुसखुशीत लेखाने मात्र कापरासारखा उडून जातो. रसिक नावाच्या लेखात गानमैफिलीतील रसिक व क्रिकेटच्या सामन्याचा रसिक या दोहोंतील साम्य छान दाखवले आहे. नारळाचं झाड हा लेखही छान जमलाय. याशिवायही या विभागात इतर छोटेखानी लेख आहेत. तेही तितकेच वाचनीय आहे.

प्रवासवर्णनाची कलाही अजितला चांगलीच साध्य आहे, हे त्याने लिहिलेली प्रवासवर्णने वाचून कळते. कोलकत्याचे लिहिलेले प्रवासवर्णन भन्नाट आहे. त्याची सूक्ष्म निरिक्षणशक्ती त्यातून दिसून येते. त्याचा हा छोटा मासला.

``कलकत्ता हे भलतेच "गोड" गाव आहे. हावडा station ते Salt Lake City मधले guest house या प्रवासात आम्हाला याचा अनुभव (की ऑनुभोव) पुरेपुर आला. प्रत्येक गल्लीत, छोट्या-मोठ्या रस्त्यांवर ठळक उठून दिसतात ती "मिष्टान्न भांडारे". 'भांडार' हा शब्द मी खादी भांडार वगॆरे wholesale context मध्ये ऎकला होता. बाग्ला भाषेत भांडार म्हणजे दुकान असल्यामुळे इथे पानाचे दुकान सुद्धा पान-भांडार अशी शेखी मिरवते. एकंदरीतच वंगभाषा अतिशयोक्तीसाठी विशेष वाटते. साधा त्रास सुद्धा "ऑशुबिधा" असा लांबलचक वॆताग देउन जातो.``

याशिवाय हिमालयातील सफर, बेळगावातील प्रवास, बंगलोरमधील अंतर्गत प्रवासाचे अनुभवही छान जमलेत. जावे त्याच्या देशा हा मलेशियन सफरीवर आधारीत तीन भागातील लेख आवर्जून वाचावा असा आहे. पुलंची छापही त्यावर प्रकर्षाने जाणवते. नाशिक ते पुणे या प्रवासावर लिहिलेला लेखही मस्त आहे. विशेषतः हा प्रवास करण्याची वेळ आलेल्यांना (हे वाक्य नकारात्मक झालं नै) तो नक्कीच आवडेल असा आहे.

कथा विभागातील फुलवाली कथा जमलीय. पण खरी मजा कविता विभागात गेल्यानंतर येते. या विभागात अजितला आवडणाऱ्या मान्यवर कवींबरोबरच त्याच्याही काही कविता आहेत. बालकवी हे त्याचे विशेष आवडते कवी. ते का आवडतात यावर त्याने लिहिलेला लेखही वाचनीय आहे. या शिवाय त्याला आवडलेल्या मान्यवर कवींच्या कविताही वाचाव्यात अशाच आहेत.

एकूणच हा ब्लॉग म्हणजे बुकमार्क करून ठेवावा असा आहे.

ब्लॉगचे नाव - उगाच उवाच
ब्लॉगर- अजित ओक
ब्लॉगचा पत्ता- http://ugaach-uwaach.blogspot.com/