बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. ब्लॉग-कॉर्नर
Written By अभिनय कुलकर्णी|

दर्जेदार मराठी साहित्याचा आस्वाद

आगामी काळात मराठी साहित्य टिकेल काय आणि टिकले तरी वाचेल कोण असले गळेकाढू परिसंवाद महाराष्ट्रात जागोजागी होत असतात. पण इंटरनेटवर जरा जरी सर्फिंग केले तर मराठी साहित्याला वाहिलेले ब्लॉग्ज सगळ्यात जास्त आहेत, हे लक्षात येईल. एवढे ब्लॉग्ज आहेत, म्हणजे त्याला वाचकही आहेत. आणि या वाचकांतही अर्थातच तरूणाईचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे आजकालचे तरूण काहीच वाचत नाही आणि मराठी साहित्य टिकेल काय या `शेवाळवगुंठित` वाक्यांना काहीही अर्थ नाही, हे लक्षात येते.

या ब्लॉग्जवर नजर फिरवली तरी नव्या पिढीचे वाचन, विचार करण्याची क्षमता व नव्या जुन्या साहित्याचा आनंद घेणारी आस्वादक्षमता दिसून येते. ही पिढी चांगले वाचणारी तर आहेच, पण चांगल्या लेखनाचीही चाहती आहे. म्हणूनच यावेळी आपण मराठी साहित्याला वाहिलेल्या आणि तेच नाव असलेल्या 'मराठी साहित्य' या ब्लॉगविषयी जाणून घेऊ.

अमेरिकेत कॅलिफोर्निया राज्यात सॅन डिएगो येथे रहाणार्‍या नंदन होडवदेकर या मर्‍हाटी संगणक अभियंत्याचा हा ब्लॉग आहे. २९ जुलै २००५ ला सुरू झालेल्या या ब्लॉगने गेल्या दोन वर्षांतच नेटकरांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेटवर भटकंती करणारे व चांगल्या साहित्याचे चाहती असणारी मंडळी या ब्लॉगला ओलांडून पुढे जात नाहीत. म्हणूनच इंडिब्लॉगतर्फे झालेल्या सर्वोत्कृष्ट ब्लॉग स्पर्धेत मराठीतील सर्वोत्कृष्ट ब्लॉग म्हणून त्याची निवड झाली आहे. आकडेवारीतच सांगायचे तर जानेवारीपूर्वीच्या सहा महिन्यात या ब्लॉगला भेट देणार्‍यांची संख्या साडेतीन हजार होती. ब्लॉगवरील साहित्याची सकसता दाखविण्यासाठी एवढे पुरेसे आहे.

आता ब्लॉगविषयी. नंदन, साहित्याचा अगदी खराखुरा चाहता आहे. अगदी त्याच्याच भाषेत सांगायचे तर साहित्य हा विषय नंदनच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळेच साहित्याविषयी दर्जेदार असे काही येथे नेहमीच वाचायला मिळते.

वास्तविक ब्लॉगवर नंदनच्या पोस्टींग खूप उशिरा होतात. पण जे काही तो मांडतो ते दर्जेदार असते. स्वतः नंदन अतिशय चांगला वाचक आहे. तो नुसता वाचक नाही. तो वाचलेले शोषतो. स्वतःत भिनवून घेतो आणि त्याच संवेदनशीलतेने तो ते इतरांपर्यंत पोहोचवतो. त्याचे वाचनही विशिष्ट लेखकांपुरते मर्यादीत नाही.

अगदी आजच्या काळात प्रसिद्धीच्या बाबतीत वळचणीला पडलेले दर्जेदार लेखकांचे लेखनही हुडकून नंदन ते लोकांसमोर मांडतो. त्यातील सौंदर्य आणि त्याच्या जागा दाखवून देतो. म्हणूनच तर दि. बा. मोकाशी या नवकथांकारांपैकीच एक मानल्या जायला हव्या अशा साहित्यिकाच्या 'आमोद सुनासि आले' या कथेतील सौंदर्य तो उलगडून दाखवतो. श्री. दा. पानवलकर यांची चित्रदर्शी वर्णनाची एक सुंदर कथाही तो आवडली म्हणून ब्लॉगवर टाकतो. आणि मोजक्या शब्दांत त्यातील सौंदर्यबिंदू दाखवून देतो.

मराठी साहित्यातील अनेक दर्जेदार उतारे तुम्हाला या ब्लॉगवर वाचायला मिळतील. पण त्याव्यतिरिक्त चांगल्या कवितांचा आस्वादही घेता येईल. अगदी पु. शि. रेगे, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, विंदा, पाडगावकर ते अगदी मर्ढेकर, अरूण कोलटकरांपर्यंतच्या कविता येथे वाचायला मिळतात. या कवितांचे सौंदर्यही नंदन अतिशय छान शब्दांत उलगडून दाखवतो.

त्यामुळे कविता त्याला जशी भावली, अगदी तशीच ती वाचकापर्यंतही पोहोचते. मर्ढेकरांच्या मुंबईवरील कवितेचे त्याने केलेले रसग्रहण अगदी वाचायलाच हवे असे आहे. बनगरवाडीत व्यंकटेश माडगूळकरांना भेटलेला आणि मुंबईतील कांदेवाडीत गंगाधर गाडगीळांना भावलेला पाऊस उतार्‍यांच्या रूपात नंदनने वाचकांच्या भेटीसाठी एकत्रित आणला आहे. दोन्ही प्रतिभावंतांची ही गळाभेट आपल्यालाही भावते.

नंदनच्या ब्लॉगवर दोस्तायेवस्की, मराठी साहित्यातील स्त्री-वाद, मराठी साहित्यातील किशोर वाड्मयाचे स्थान अशा अनेक विषयांवर लिहिलेले लेख आहेत. नंदन चांगल्या साहित्याचा चाहता तर आहेच, पण या आवडीचे वर्तुळ विस्तारावे यासाठी प्रयत्न करणारा कृतीशील वाचकही आहे. या कृतीशीलतेतूनच त्याने दोन उपक्रम राबविले. आपल्या आवडणारी पाच पुस्तके, वाचायची राहिलेली पाच पुस्तके ही वाचनमोहिम त्याने राबवली.

अनेकांना त्याने यासाठी 'टॅग' केले. त्यातून चांगल्या पुस्तकांचे संचित जमा झाले. मराठीतील चर्चेत असणारी व चांगली पुस्तके म्हणूनही ही यादी (प्रत्येकाची वेगळी असली तरीही) महत्त्वाची आहे. सध्या तो 'जे जे उत्तम' हा उपक्रम राबवतो आहे. यात मराठी साहित्यात जे चांगले उतारे वाचनात येतात, ते नेटवर द्यायचे असा हा उपक्रम आहे. यातही टॅग केले जाते, त्यामुळे ज्याला टॅग केले जाते त्यावर आपल्या वाचनात आलेले चांगले उतारे देण्याची जबाबदारी येते. यामुळे चांगले काही जे वाचनातून सुटून गेले किंवा वाचताना न लक्षात आलेले असे सौंदर्य अनुभवायला मिळते.

नेटवर फिरताना वेळ वाया न घालविण्यासाठी आणि चांगले काहीतरी वाचायला मिळेल या आशेने फिरत असाल तर या ब्लॉगला नक्की भेट द्या. नंदनचा या व्यतिरिक्त अनुदिनी अनुतापे, Viprashna, Amalgam of thoughts, A picture is worth... हे तीन ब्लॉग आहेत. तेही आवर्जून भेट देण्यासारखे आहेत.

ब्लॉगर- नंदन होडवदेकर
ब्लॉगचे नाव- मराठी साहित्य
ब्लॉगचा पत्ता- http://marathisahitya.blogspot.com

वेबदुनियाचे नवीन सदर ब्लॉग कॉर्नर