मराठी ब्लॉगविश्वाचा धांडोळा घेताना त्यातील विषय विविधतेने चकित व्हायला होतं. त्याचवेळी या ब्लॉगवर लिहिला जाणारा मजकूर व त्याचा दर्जा पाहून मन खरोखरच मोहरून येतं. भाषेवर उत्तम पकड असणारे व सकस लेखन करणारे अनेक ब्लॉगर आहेत. त्यांना आपण 'लेखक' म्हणायलाच हवे. (लेखक हा शब्द केवळ कागदावर लिहिणार्यांपुरता मर्यादीत आहे का?) या आठवड्यात अशाच एका चांगल्या लेखकाच्या ब्लॉगची ओळख आम्ही तुम्हाला करून देणार आहोत.
'विदग्ध' या नावाचा हा ब्लॉग असून शैलेश खांडेकर हे त्याचे लेखक आहेत. पुणे येथे रहाणारे खांडेकर त्यांच्या भाषेत सांगायचे तर 'संगणक आज्ञावलीच्या' चवर्या ढाळतात. संगणक क्षेत्रात काम करत असणार्या खांडेकरांचे भाषा, गणित, संगणक, संगीत, भौतिकशास्त्र, व्याकरण असे अनेक विषय आवडीचे आहेत. हा ब्लॉग विशिष्ठ विषयाला असा वाहिलेला नाही. पण बहुतकरून त्यावर कथा, स्फूट, काव्य, ललित, तंत्रज्ञान व विनोदी लेखन या प्रकारातील लेखन आढळते. गेल्या वर्षी फेब्रुवारीत हा ब्लॉग सुरू झाला. ''अमृताते पैजा जिंकणा-या रसाळ मराठी भाषेतील एक लहानशी ज्ञानज्योत'' असे खांडेकर आपल्या ब्लॉगचे वर्णन करतात.
नांदीलाच पाऊस या विषयावर त्यांनी अप्रतिम ललित लिहिलं आहे. त्यांच्या लेखनाचा हा मासला पहा.
''ऊन-पावसाच्या खेळात रंगांचा दंगा चालतो. जेथे अक्ष रमतात ते अक्षर असे एक वचन आहे. पाऊस म्हणजे अक्षांचा विसावा आहे. तशीच प्रेरणाही आहे. इंद्रधनुच्या या जनकाचे आणि वा-याचे विशेष अनुबंध आहेत. हे दोघे सूर्याचे किरण आपल्या ओंजळीत झाकून तृर्षात डोळ्यांत आशेचे किरण जागवतांत.''
ललितलेखनाची नस खांडेकरांना सापडली आहे. त्यामुळेच त्यांचे समईची शुभ्र कळी, सौंदर्य, ग्रीष्माख्यान, समुधूर भाषिणीम वाचायला मजा येते. भाषेवरची त्यांचे चांगले प्रभूत्व आहे. शिवाय त्यांचे वाचनही उत्तम असल्याचे कळते. लिहिता लिहिता अचानक ते संदर्भ देऊन जातात त्यातून या वाचनाचा प्रत्यय येतो.
याशिवाय खांडेकरांचा विनोदी लेखनाचा बाजही छान जमला आहे. बारीकरावांनी भिंगेबाईंना निविदा सूचनांच्या रूपात लिहिलेले प्रेमपत्रही झकास जमले आहे. उड्या मारण्याचा जागतिक दिन वगैरे हास्यस्फुटेही वाचनीय आहेत. साहित्यिक्स हे स्फूट तर मस्तच जमलंय. ब्लॉगला मराठीत नेमके काय म्हणायचे जालनिशी? नोंदस्थळ, अनुदिनी की कोणता शब्द वापरावा, यावर खांडेकरांनी पाडलेला 'किस' वाचण्यासारखा आहे.
हास्यस्फुटाव्यतिरिक्त खांडेकरांचे इतर स्फूटलेखनही छान आहे. थोडक्यात पण चांगले काही वाचल्याचा आनंद त्यातून मिळतो. पण या स्फूट प्रकारात त्यांनी अनेक विषयांवर लिहिले आहे. अगदी सी. व्ही. रामन, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यापासून ते अगदी मनात असलेल्या एखाद्या विषयावर लिहिले आहे. रवींद्रनाथ ठाकूरांच्या गीतांजलीचा एका मराठी गृहस्थाने संस्कृतात अनुवाद केला. त्याविषयीचे स्फूटही वाचनीय आहे. याशिवाय त्यांनी एक नाटकही लिहिले आहे. महत्त्वाचे म्हणजे सध्या ते सखे नावाची एक कादंबरी लिहित असून त्याचे २७ भाग झाले आहेत.
खांडेकरांना महाजालावर भटकण्याचाही चांगलाच नाद आहे. अर्थातच हा नाद त्यांना ज्ञानाच्या अनेक पाणपोयांपर्यंत नेऊन पोहोचवतो. सहाजिकच 'जे जे आपणा ठावे ते ते इतरांस सांगावे' या न्यायाने मग ते त्याची माहिती इतरांपर्यंत पोहोचवतात. त्यातून खूप चांगली माहिती मिळते. उदा. अंकाविषयी लिहिलेल्या स्फुटात त्यांनी छंद बाळगणार्यांविषयीचा दुवा दिला आहे. अनेकदा आपल्याला अनेक बिनकामाचे इ- मेल येत असतात. त्यांना रोखण्याविषयीच्या संकेतस्थळाचा दुवा अशा अनेक संकेतस्थळांची माहिती आपल्याला यातून मिळते.
खांडेकर स्वतः संगणकाच्या दुनियेत असल्याने या विषयावरील लेखही येथे बरेच आहेत. त्याच्याविषयीच्या माहितीचा संकेतही ते देतात. त्यामुळे वाचकाच्या रोखाने जणू माहितीचा पूर वाहत असतो. उदा. बिल गेट्सच्या निवृत्तीसंदर्भातही त्यांनी अनेक दुवे सुचविले आहेत.
खांडेकरांच्या या ब्लॉगचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर संगणकविषयक शब्दांसाठीची 'मर्हाटी' भाषा आहे. संगणकीय शब्दांना मराठी प्रतिशब्द देण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. त्यासाठीच त्यांचा एक उपक्रमही सुरू आहे. त्याअंतर्गत त्यांनी दिलेले हे पर्याय वाचा बरं.
''Bulleted list (text style) चिंचोग्दी (चिंचोक्या+यादी, संधी, त्याचे लघुरूप, Computing संगणन, Connection संयुज, Constant अधृव, Control-Click नियंचकी, CPU / Central Processing Unit समात्य (संगणकाचा अमात्य), Cursor दर्शल Operating System संविधी (संगणन विधी)''
मातृभाषेविषयी आत्यंतिक आग्रही असणार्या खांडेकरांचा मर्हाटी बाणा यातून दिसून येतो. म्हणून ''मी ध्वन्यपथाने विश्वगोफात शिरत असल्याने संयुज वेग मर्यादितच मिळतो.'' हे वाक्यही ते लिलया लिहून जातात. त्यांच्या मते इंग्रजी शब्दाला पर्याय म्हणून दिलेले हे शब्द सुरवातीला अपरिचित वाटतील. पण एकदा रूळले तर मराठीत या शब्दांची भरच पडेल. खांडेकरांची ही मनीषा नक्कीच पूर्ण होईल. मग या ब्लॉगला नक्की भेट देणार ना?