गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मागोवा 2017
Written By

2017 मधील बीट कॉईन्सची आकडेवारी थक्क करणारी....

बीट कॉईन्स सध्या चर्चेत असलेले चलन, असे चलन जे तुम्हाला श्रीमंत बनवतं आणिते सोबत बाळगायचं देखील नाही कारण हे एक आभासी चलन आहे. थोडंसं आश्चर्य वाटलं असेल पण हे खरं आहे. 2009 साली बीट कॉईन्स अस्तित्वात आले आणि 2017 मध्ये त्यास प्रसिद्धीची झळाली मिळाली. बीट कॉईन्समध्ये कोणतीही बँक सहभाग नोंदवीत नाही, कोणताही एजंट यामध्ये सहभागी नसतो, तुम्ही थेट ज्यास पैसे देणे लागता त्यास ते ट्रान्सफर करू शकता यासाठी आभासी पाकीट तुम्हाला पुरविण्यात येते. हे आभासी चलन वापरण्यासाठी देशाची बंधने आडवी येत नाहीत, हे चलन देशाच्या सीमांनाही सहज ओलांडताना दिसून येत आहे. याचे पेमेंट करताना कोणत्याही प्रकारचे चार्जेस आकारण्यात येत नाहीत, ही बाब विशेष आहे. काही मंडळी बीट कॉईन्सची खरेदी गुंतवणूक म्हणून करताना आढळत आहेत, काय सांगावे भविष्यात त्याचा त्यांना योग्य परतावा मिळेल!
 
बीट कॉईन्स एक्स्चेंजच्या माध्यमातून लोक बीट कॉईन्स खरेदी करीत आहेत. ही खरेदी करताना देशाचे चलन महत्त्वाचे राहात नाही. ही बाब विशेष नोंद घेण्यासारखी आहे. नुकतेच भारतामध्ये बीट कॉईन्स ज्यांच्याकडे आहेत असा संशय असणार्‍यांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. बीट कॉईन्स वापरासाठी वेगळे कायदे असणेगरजेचे आहे. कारण 2017 मधील बीट कॉईन्सची आकडेवारी थक्क करणारी आहे. आज दिवशी भारतीय चलनाप्रमाणे एक बीट कॉईन म्हणजे 11,39,387.34 रुपये एवढी मोठी रक्कम आहे. झालात ना थक्क! वाटले ना आश्चर्य!
 
बीट कॉईन्स डिजिटल कॅश ज्याप्रमाणे पाठविली जाते त्याचप्रमाणे पाठविता येतात. गणिती कोडी सोडवून बीट कॉईन्स मिळविता येतात, याचा वापर वाढत आहे. साधारणपणे एक गणिती कोडे जर यशस्वीपणे सोडविले तर 12.5 बीट कॉईन्स कमविता येतात आणि तेही सरासरी 10 मिनिटामध्ये. बीट कॉईन्स या डिजिटल वॉलेटमध्ये ठेवता येऊ शकतात. हे वॉलेट म्हणजे तुमचे बँक खाते जसे असते अगदी त्याप्रमाणे! याचा वापर करून तुम्ही बीट कॉईन्सची देवाण-घेवाण करू शकता. पण बँकांना ज्याप्रमाणे रिझर्व बँकेचे संरक्षण, मापदंड असतात त्याप्रमाणे यास कोणतेही संरक्षण उपलब्ध नाही, हे समजून घेणे नितांत आवश्यक आहे. बीट कॉईन्सची मागणी करणारे काही व्हायरसदेखील अस्तित्वात आहेत ज्यामध्ये रॅन्समवेअरचे नाव प्रामुख्याने घ्यायला हवे.
 
बीट कॉईन्स वापरताना खरेदी करणारा व विकणारा या दोघांची ओळख गुप्त राहते. त्या दोघांचे फक्त वॉलेट आयडीने दोघांची माहिती मिळू शकते. त्यामुळे व्यवहारात खूपच गुप्तता आपोआप पाळली जाते आणि हाच मुद्दा लोकांना भावत असावा. 
 
बीट कॉईन्सच्या वापरावर कोणत्याच देशाची बंधने नाहीत त्यामुळे याचे भविष्य काय असेल हे आज तरी वर्तविणे अवघड आहे पण जपान, चीन, ऑस्ट्रेलिया या देशांनी नियमांचे उपाययोजन सुरू केले आहे आणि सोबतच प्रत्येक ठिकाणच्या शासनास यावर टॅक्स कसा आकाराचा यावर विचारमंथन सुरु झालेले आहे. आज तरी मोहात न पडता बीट कॉईन्सपासून लांब राहिलेले बरे, असेच सुचवावे वाटते.
 
अमित कामतकर