विमान उडणार, येत्या २५ मे पासून देशातंर्गत हवाई वाहतूक सुरू
अखेर लॉकडाउनचे तीन टप्पे पूर्ण झाल्यानंतर चौथ्या टप्प्याच्या अखेरीस विमान वाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ट्विट करून याविषयीची माहिती दिली आहे.
“२५ मे पासून अंशकालीन पद्धतीनं देशातंर्गत हवाई वाहतूक सुरू करण्यात येईल. २५ मे पासून विमानसेवा सुरू करण्यासाठी सज्ज राहावं, अशी माहिती सर्व विमानतळाच्या प्रशासनाला आणि हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना देण्यात आली आहे. प्रवाशांच्या प्रवासांसंदर्भात नियमावली केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडून जारी करण्यात येईल,” असं हरदीप सिंह पुरी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
हवाई वाहतूक सुरू करताना करोनाचा प्रसार होणार नाही, याची काळजी घेण्याचं आवाहन सरकार समोर असणार आहे. विशेषतः याबाबत महाराष्ट्र सरकारला मुंबईत विशेष लक्ष द्यावं लागणार आहे. कारण वाहतूक सुरू झाल्यानंतर मुंबईत येणाऱ्यांची संख्या इतर विमानतळांच्या तुलनेत जास्त असू शकते.