बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 14 जून 2021 (12:13 IST)

सरकारचं उत्पन्न कमी, खर्च जास्त; त्यामुळे पेट्रोलचे दर कमी होणार नाहीत- धर्मेंद्र प्रधान

"सरकारचं उत्पन्न बरंच कमी झालं आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात उत्पन्न कमी राहिलंय आणि 2021-22 मध्येही कमी राहण्याची शक्यता आहे. सरकारचे उत्पन्न कमी आहे आणि खर्च जास्त आहे. त्यामुळे इंधन दर आता कमी करता येणार नाहीत," असं पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केलं आहे.
 
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील इंधन दर वाढीवरून मोदी सरकारवर निशाणा साधलेला आहे. यावर आता केंद्रीयमंत्री पेट्रोलियम धर्मेंद्र प्रधान प्रत्युत्तर देत इंधन दरवाढीबद्दल खुलासा केला आहे.
 
राहुल गांधींनी इंधन दर वाढीवरून केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं की, "त्यांचा पक्ष सत्तेत असलेल्या महाराष्ट्रात इंधन दरात वाढ का आहे? या प्रश्नाचं उत्तर राहुल गांधींनी आधी द्यावं. राजस्थान, पंजाबमध्ये का इंधन दर वाढ झालेली आहे? अशी बेजबाबदार वक्तव्य राहुल गांधींच करू शकतात."
 
"या कठीण काळात आम्ही पैसे वाचवून लोक कल्याणाच्या कामात लावले. जर राहुल गांधींना गरिबांबद्दल एवढीच कळवळ चिंता आहे, तर त्यांनी आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आदेश द्यावा. महाराष्ट्राचा कर देशात सर्वांत जास्त असल्यामुळे आज मुंबईत पेट्रोल महाग आहे. राजस्थानात पेट्रोलवर सर्वांत जास्त कर आहे," असं धर्मेंद्र प्रधान यांनी बोलून दाखवलं.