शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 1 नोव्हेंबर 2021 (17:03 IST)

५ हजार एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फची नोटीस

मुंबई - आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले असताना या कर्मचाऱ्यांवर आता कारवाई होणार आहे. बेकायदेशीर संप पुकारणाऱ्या ५ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना बडतर्फची कारवाई केली जाणार आहे. बेकायदेशीर संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळांने नोटीस बजावली आहे.
 
गेल्या पाच दिवसांपासून राज्यभरातील ३४ आगार बंद आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीने एसटी महामंडळासोबत यशस्वी चर्चेअंती आपले आंदोलन २८ आक्टोबरच्या मध्यरात्रीपासून मागे घेतले होते. 
 
तरीही काही आगारांमध्ये नियमबाह्य आंदोलन, संप, निर्देशने सुरू आहेत. याबाबत एसटी महामंडळाने औद्योगिक न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. याचिकेवर अंतरिम आदेश देत असताना, औद्योगिक न्यायालयाने संबंधित आंदोलने, संप, निर्देशने बेकायदेशीर ठरवले असून प्रतिबंधात्मक आदेश पारित केले आहेत.
 
आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी एसटी महामंडळ राज्य शासनात विलीन करण्याबरोबरच अन्य मागण्यांसाठी राज्यातील 250 पैकी 39 आगारांमध्ये संप सुरूच आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू असून, सोमवारपासून कामगार कामावर रुजू न झाल्यास बडतर्फीची कारवाई करणार असल्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी जाहीर केलं होतं.
 
एसटी कामगारांच्या संपामुळे राज्यातील लातूर विभागातील 5, नांदेड विभागातील 9, भंडारा विभागातील सहापैकी 3, गडचिरोली विभागातील सर्व 3, चंद्रपूर विभागातील 4, यासह कोल्हापूर, वर्धा, सांगली, सोलापूर, नाशिक, यवतमाळ, अमरावती विभागातील एकूण 39 आगारं सायंकाळी पाचपर्यंत बंद होती.