शनिवार, 24 फेब्रुवारी 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 2 फेब्रुवारी 2022 (11:22 IST)

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रंगणार सुरांची मैफल

‘मी वसंतराव' १ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला..
 
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील मोठे नाव म्हणजे पंडित वसंतराव देशपांडे. ठुमरी, दादरा आणि गझल हे हिंदुस्तानी गायकीचे प्रकार त्यांनी अत्यंत सहजतेने सादर केले. कला ही कलाकाराच्या आयुष्याचा आरसा आहे, असे मानणाऱ्या वसंतरावांनी आपले अवघे जीवन, शास्त्रीय संगीताबरोबरच मराठी नाट्यसंगीतासाठी अर्पण केले. आणि त्यांच्या ‘कट्यार काळजात घुसली’ या संगीत नाटकाने, त्यांच्या भूमिकेने आणि गायकीने संपूर्ण महाराष्ट्राला वेडं लावले ज्याची जादू आजही कायम आहे.
 
अभिजात संगीतातील या महान कलाकाराच्या जीवनावर आधारित 'मी वसंतराव' हा बहुप्रतीक्षित चित्रपट गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच १ एप्रिल रोजी ही सुरांची मैफल प्रेक्षकांसमोर सादर होणार आहे. आणि या चित्रपटाच्या निमित्ताने जिओ स्टुडिओज प्रथमच मराठीत पदार्पण करत आहे.  
 
जिओ स्टुडिओज प्रस्तुत चंद्रशेखर गोखले, दर्शन देसाई, निरंजन किर्लोस्कर निर्मित ' मी वसंतराव' या चित्रपटाचे दिग्दर्शन निपुण धर्माधिकारी केले आहे. तर वसंतराव देशपांडे यांची भूमिका खुद्द त्यांचे नातू राहुल देशपांडे साकारणार आहेत. याचबरोबर अनेक लोकप्रिय कलाकार अनिता दाते, पुष्कराज चिरपुटकर, कौमुदी वालोकर आणि अमेय वाघ हे प्रमुख भूमिकेत असणार आहेत. तर चित्रपटाचे संगीत राहुल देशपांडे यांनीच दिले आहे.
 
नुकत्याच पार पडलेल्या गोवा येथील नामंकित चित्रपट महोत्सवात, मी वसंतराव चित्रपटाची निवड आंतरराष्ट्रीय विभागत निवड झाली होती. आणि तेव्हापासूनच प्रेक्षकांच्या मनात वसंतराव देशपांडे यांच्या जीवनाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता वाढली होती. आणि आता अखेर हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
 
चित्रपटाचे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी म्हणतात, ''मी वसंतराव' या चित्रपटावर आम्ही गेले ९ वर्षं काम केले आहे आणि आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, याचा नक्कीच आनंद आहे. मात्र एखाद्या महान व्यक्तीचा जीवनपट पडद्यावर दाखवणे ही नक्कीच सोपी प्रक्रिया नाही. हे आव्हानात्मक काम आहे. पण यात तो काळ, व्यकितमत्वाचे पैलू, निर्मिती प्रक्रिया आणि मुख्य म्हणजे संगीत, हे सर्व निर्माण करण्यासाठी संपूर्ण टीमने अथक प्रयत्न केले आहेच. आणि वसंतरावांची भूमिका त्यांचे नातू राहुल देशपांडे यांनीच साकारली असल्याने ही खूप मोठी जमेची बाजू ठरली आहे. मला खात्री आहे की जेव्हा प्रेक्षक चित्रपटगृहात याचा अनुभव घेतील त्यांना या सगळ्या कलात्मकबाबींची प्रचिती येईल”
 
चित्रपटाचे प्रमुख कलाकार, संगीत दिग्दर्शक आणि प्रख्यात गायक राहुल देशपांडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, “जवळ जवळ 9 वर्षापुर्वी मी एक स्वप्न पाहिलं होतं. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी निपुण, शेखर, श्रीकांत, निरंजन, रणजित, निखिल आणि अनेक मित्र-मैत्रीणिंनी अथक परिश्रम घेतले. ते स्वप्न पूर्ण होण्‍याची आम्ही सगळे आतुरतेने वाट पहात होतो… आणि आता ते 1 एप्रिलला, गुढीपाडव्याच्‍या शुभमुहूर्तावर साकार होत आहे. आजोबांचं व्यक्‍तिमत्व आभाळयेवढं होतं.. त्‍यांच्‍या व्‍यक्‍तिमत्वाला साजेशी श्रद्धांजली वाहू शकतोय याचं  समाधान सगळयात जास्त आहे.“