शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 3 मे 2023 (09:56 IST)

BALOACH - ५० डिग्री तापमानात चित्रित झाला 'बलोच'

baloch
पानिपतच्या लढाईत मराठ्यांना पराभव पत्कारून परक्यांची गुलामगिरी स्वीकारावी लागली. याच भयाण वास्तवाचे दर्शन घडवणारा 'बलोच' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे अंगावर शहारा आणणारे ट्रेलर प्रदर्शित झाले. ट्रेलरवरून याचे चित्रीकरण किती आव्हानात्मक असेल, याचा आपण निश्चितच अंदाज बांधू शकतो. पडद्यावर हे वास्तव खरेखुरे भासावे, याकरता या चित्रपटात नैसर्गिकतेचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे.  मेकअप, पोशाख ते अगदी चित्रीकरण स्थळापर्यंत सगळ्याच गोष्टी नैसर्गिक दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 'बलोच'चे चित्रीकरण हे जैसलमेरच्या रखरखीत उन्हात ५० डिग्री तापमानात झाले आहे. दिवसा इथले तापमान ५० डिग्री असायचे तर रात्री हे तापमान सुमारे ९-१० डिग्रीपर्यंत जायचे.अशा संमिश्र तापमानात चित्रपटातील सर्व कलाकारांनी चित्रीकरण पूर्ण केले. भारत - पाकिस्तान बॉर्डरवर या चित्रपटाचे चित्रीकरण होत असताना कलाकारांना अनेक चांगल्या वाईट अनुभवांना सामोरे जावे लागले. असे असले तरी पाकिस्तानी जवानांनी सीमेपार उभं राहून 'बलोच'च्या चित्रीकरणाचा आनंद लुटला.
 
या अनुभवाबद्दल प्रविण तरडे म्हणतात, "महाराष्ट्रातील ४० डिग्री तापमानात आपली अवस्था खराब होते. तिथे ५० डिग्री तापमानात आम्ही चित्रीकरण केले. या रखरखत्या उन्हात चित्रीकरण करणे आमच्यासाठी खूप आव्हानात्मक होते. आमची ४०-५० जणांची टीम होती. सीन चित्रित झाल्यावर आम्ही तंबूत जायचो, मात्र तिथेही उन्हाच्या झळा यायच्या. आम्हाला भीती होती की, चित्रीकरणादरम्यान काही शारीरिक अडचणी येऊ नयेत आणि सुदैवानं असं काहीही झालं नाही. सगळं सुरळीत पार पडलं. एक मात्र आवर्जून सांगावसं वाटतं, ते म्हणजे या रखरखत्या उन्हात मराठे कसे लढले असतील, याचा अंदाज आम्हाला इथे आला. खरंतर पानिपतचे युद्ध हा मराठ्यांचा पराभव नसून ही मराठ्यांची विजयगाथा आहे आणि हेच आम्हाला या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचीआहे.''
 
अमेय विनोद खोपकर, विश्वगुंज पिक्चर्स, कीर्ती वराडकर फिल्म्स आणि अमोल कागणे स्टुडिओज प्रस्तुत 'बलोच' या चित्रपटाचे दिग्दर्शक, कथा, पटकथाकार प्रकाश जनार्दन पवार आहेत. तर महेश करवंदे (निकम), जीवन जाधव, गणेश शिंदे, दत्ता काळे (डी. के.), जितेश मोरे, संतोष बळी भोंगळे, नेमाराम चौधरी, बबलू झेंडे, गणेश खरपुडे, ज्ञानेश गायकवाड निर्माते असून पल्लवी विठ्ठल बंडगर, सुधीर वाघोले, विजय अल्दार हे सहनिर्माते आहेत. 'बलोच'मध्ये  प्रवीण तरडे, अशोक समर्थ, स्मिता गोंदकर, अमोल कागणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या ५ मे रोजी ‘बलोच’ चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार असून या चित्रपटाच्या वितरणाचे काम फिल्मास्त्र स्टुडिओजच्या अमेय खोपकर, अमोल कागणे आणि प्रणित वायकर यांनी पाहिले आहे.