रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

22 डिसेंबरला उलगडणार ‘चरणदास चोर’च्या पेटीचे रहस्य

ज्या आठवड्यात एखादा मोठा हिंदी सिनेमा प्रदर्शित होतो, त्याच आठवड्यात सोडा पण त्याच्या आजुबाजुच्या आठवड्यातही मराठी सिनेमा प्रदर्शित होताना दिसत नाही. आधीच थिएटर्स आणि शोज् मिळविताना मारामारी होत असताना मोठ्या हिंदी सिनेमा समोर कसे यायचे? असा विचार करून एखादी सोयीची तारीख ठरवून एकाच आठवड्यात सहा-सात मराठी सिनेमे सध्या प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे उत्तम कथानक, सादरीकरण आणि अनेक मानाचे पुरस्कार मिळुनही मराठी सिनेमा प्रेक्षकांपासून वंचित राहतो आहे. महाराष्ट्रात मराठी सिनेमाची होणारी ही वाताहात पाहून दु:ख होते. पण, असं किती दिवस चालायचं? कितीही मोठ्या सुपरस्टारचा किंवा मोठ्या बॅनरचा सिनेमा का असेना? त्याच आठवड्यात मराठी प्रेक्षकांना मराठी सिनेमाचा उत्तम पर्याय उपलब्ध व्हायलाच हवा. असा विचार करून, तितक्याच ताकदीने उतरण्याची तयारी युनीट प्रोडक्शन निर्मित चरणदास चोर या सिनेमाने सुरू केली आहे आणि त्याला चित्रपट वितरक पिकल एंटरटेनमेन्टची साथ लाभली आहे. २२ डिसेंबर रोजी ‘चरणदास चोर’ सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’ समोर प्रदर्शित होत असल्याने, त्याच त्याच आशयाचे एकावर एक चित्रपट पाहाण्यापेक्षा चरणदास चोर सारखा मार्मिक आणि तार्किक विनोदी मराठी चित्रपट प्रेक्षकांना पाहाण्याची उत्तम संधी मिळणार आहे. या चित्रपटाचा पहिला पोस्टर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला आहे.
 
ऋषिकेश मुखर्जी आणि बासू चटर्जीं सारख्या महान चित्रकर्मींच्या मार्मिक पण सहज विनोदाच्या शैलीने प्रभावित होऊन लेखक-दिग्दर्शक श्याम महेश्वरी आणि क्रीएटीव्ह दिग्दर्शक संजू होलमुखे यांनी ‘चरणदास चोर’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या सिनेमाचा पहिलाच पोस्टर फार गमतीदार आहे. चित्रपटाचे नाव जरी चरणदास चोर असले तरी पोस्टर मध्ये चोर कुठे दिसत नाही. त्याऐवजी एक पत्र्याची सुंदर रंगवलेली ट्रंक रेल्वेच्या रुळावर ठेवलेली दिसते आहे. त्यामुळे चित्रपटातील हो चोर नक्की कोण याचीही उत्सुकता लागली आहे. पोस्टरची रंगसंगती पाहून सिनेमाचा लूक एकदम फ्रेश असणार यात शंका नाही. त्यावर नमूद केलेल्या संत कबिरांचा दोह्यामुळे चित्रपटाचा गाभा स्पष्ट होतो. त्यामुळे चित्रपटाबाबत उत्सुकता आणखिनच वाढली आहे. चरणदास चोर हा टायगर...सलमान च्या तुलनेत लहान असला तरी विशालहृदयी अन् निखळ मनोरंजन करणारा नक्कीच आहे.