1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 जून 2018 (13:36 IST)

'ड्राय डे' सिनेमातील जोशपूर्ण 'दारू डिंग डांग' गाणे ठरतेय सुपरहिट

हल्ली मराठी चित्रपटांच्या हटके नावाचा ट्रेंड रुजू झाला आहे. या हटके नावांमुळे चित्रपटांची प्रसिद्धी अधिक होत असल्याकारणाने, मराठी सिनेमांच्या या अद्भुत नावांचे स्वागतदेखील सिनेरसिक करताना दिसून येत आहे. आनंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि पांडुरंग जाधव दिग्दर्शित ‘ड्राय डे’हा सिनेमा देखील याचे उत्तम उदाहरण आहे. येत्या १३ जुलै रोजी प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमातील 'दारू डिंग डांग' हे गाणेदेखील सिनेमाच्या नावाला साजेल अगदी तसेच आहे ! नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर आणि टीव्हीवर प्रदर्शित करण्यात आलेल्या या गाण्याला अल्पावधीतच तुफान प्रसिद्धी मिळत आहे.
 
जय अत्रे लिखित आजच्या तळीरामांसाठी खास लिहिलेले 'दारू डिंगडांग' हे गाणे तरुणांसाठी झिंग चढवणारे ठरत आहे. हिंदीचे प्रसिद्ध गायक विशाल दादलानी यांच्या भारदस्त आवाजात सादर झालेल्या या गाण्याच्या ठेक्यावर प्रत्येकजन ताल धरत आहे. तसेच, अनेक पार्ट्यांमध्ये हे गाणे मोठ्याप्रमाणात वाजवले जात आहे. ऋत्विक केंद्रे, मोनालिसा बागल, कैलाश वाघमारे, योगेश माधव सोहनी, चिन्मय कांबळी यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्याची कॉरीयोग्राफी आघाडीचे नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य याच्या तालमीत तयार झालेले राहुल आणि संजीव या जोडीने केली असल्यामुळे, हे गाणे दमदार झाले आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतल्या या 'ड्राय डे' चे लेखन दिग्दर्शक पांडुरंग जाधव यांनीच केले असून, नितीन दीक्षित यांनी पटकथा व संवाद लिहिले आहेत. डीओपी नागराज दिवाकर यांच्या कॅमेऱ्यात चित्रित झालेल्या या सिनेमाचे संकलन अमित कुमार यांनी केले आहे. संजय पाटील यांची निर्मिती असलेल्या या सिनेमात चिन्मय कांबळी, मोनालिसा बागल, आयली घिए,अरुण नलावडे, पार्थ घाडगे आणि जयराम नायर हे कलाकारदेखील आपल्याला पहायला मिळणार आहेत.