मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 19 डिसेंबर 2019 (10:32 IST)

'डोम एक धगधगत्या दाहक आयुष्याचा वेध घेणारा'

आयुष्याचे नियम विचित्र असतात. माणूस मेल्यानंतर एकदा जळतो पण स्मशानात येणाऱ्या चितेबरोबर डोम रोजच जळत असतो. डोम म्हणजे स्मशान आणि चितेचा रक्षकच.. काहींच्या आयुष्यात सुखच सुख असतं तर काहींना जीवनाची दाहकता पार पोळून टाकत असते. याच डोमची दोन वेळची भाकरी स्मशानात अंत्यविधीच्या कामावर अवलंबून असते. 
 
त्यांचं जीवन हे संघर्षमय असतं. स्मशानातल्या चितेच्या साक्षीने जगत असलेल्या त्यांच्या संघर्षमय आणि दाहक आयुष्याचा वेध घेणारा डोम हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात स्मशानात काम करणाऱ्यांच्या दोन पिढ्यांमधला संघर्ष दाखवण्यात येणार आहे. या कथेत एक सुंदर त्रिकोणी प्रेमाचा रंग पहायला मिळणार आहे. या चित्रपटाची कथा जरी काल्पनिक असली तरी ती एका अतिशय संवेदनशील सामाजिक विषयाने परिपूर्ण आहे.  
सह्याद्री पिक्चर्स आणि जम्पिंग टोमॅटो मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली डोमची निर्मिती झाली असून सहनिर्माता अभय आर. तांबे आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलरही लाँच करण्यात आला. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रदीप दळवी यांनी केले असून सतीश साळवे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता आहेत. या चित्रपटाला संदीप डांगे यानी संगीत दिले असून पार्श्वसंगीताची धुराही त्यांनीच सांभाळली आहे. प्रि. आर. एल. तांबे आणि विठ्ठल वाघ यांच्या लेखणीतून उतरलेली गीते चित्रपटाला लाभली आहेत. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी राज कडूर (अन्ना) यांनी सांभाळली असून संकलन सचिन नाटेकर यांनी केले आहे. चित्रपटातील साहसदृश्ये प्रशांत नाईक यांनी डिझाईन केली आहेत तर चित्रपटातील गाण्यांचे नृत्य दिग्दर्शन निकी बत्रा यांचे आहे. 
 
या चित्रपटात डॉ. विलास उजवणे, अंजली उजवणे, मोहन जोशी, ज्योती निसळ, आर. एल. तांबे, अनिता नाईक, संजय शेजवळ, दीप्ती धोत्रे, मयुरी कापडणे, सुनील गोडबोले, मेघा घाडगे, प्रदीप पटवर्धन, अविनाश जाधव, गीतांजली कुलकर्णी, सतीश साळवे, निर्मला, बाल कलाकार विनायक दळवी, श्रेया सुर्वे, तीर्था निंबाळकर, अनुष्का शिंदे, श्रुती पोळ आणि प्रदीप दळवी हे कलाकार असणार आहेत. हा चित्रपट एक सामाजिक चित्रपट असून, यात जुन्या आणि नव्या पिढीतील संघर्ष दाखवण्यात आल्याचं मनोगत दिग्दर्शक प्रदीप दळवी यांनी व्यक्त केलं आहे. 
 
डोम या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटी, कोल्हापूर, वज्रेश्वरी (नांदणी), डहाणू येथे झाले आहे. जगणाची संघर्षमय व्यथा सांगणारा डोम येत्या 27 डिसेंबर 2019 रोजी प्रदर्शित होत आहे.