जीव धोक्यात घालून किंग जे. डी. चा नवा स्टंट
संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या रॅपने थिरकवणारा श्रेयश जाधव उर्फ किंग जे. डी. पुन्हा एकदा जल्लोष करण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात करण्यासाठी किंग जे.डी. आपल्या फॅन्ससाठी घेऊन येत आहे एक नवीन 'रॅप सॉन्ग'. या गाण्याचे बोल अद्याप पडद्याआड असले, तरी या गाण्यातील एक गुपित समोर आले आहे. या गाण्यात श्रेयश चक्क एअरक्राफ्टवर नाचणार आहे. विशेष म्हणजे एअरक्राफ्टवर नाचण्यासाठी श्रेयशने 'बॉडी डबल'चा किंवा कोणत्याही सुरक्षासंबंधित वस्तूचा वापर केलेला नाही. केवळ एक उत्तम शॉट मिळावा, याकरता किंग जे. डी. ने आपला जीव धोक्यात घालून हे गाणे शूट केले असून सर्वांनाच थक्क करणारा हा स्टंट आहे.
या स्टंटबद्दल श्रेयश म्हणतो, '' या गाण्यात मी पहिल्यांदाच स्टंट केले आहेत. खरे तर ते माझ्यासाठी आव्हान होते, तरीही मी ते स्वीकारले. यात मला एअरक्राफ्टवर कुठल्याही सुरक्षेशिवाय नाचायचे होते. त्यात एअरक्राफ्ट डोंगरावर खूप उंचावर होते. त्यामुळे छोटीशी चुक सुद्धा खूप महागात पडली असती आणि आम्ही जिथे शूट केले तिथले तापमान २ डिग्री सेल्शिअस होते. एकदंरच सगळे आव्हानात्मक होते. त्यात काही महिन्यांपूर्वी मला खांदेदुखीचा त्रास झाला होता आणि त्यातून मी नुकताच बाहेर पडतोय.त्यामुळे जरा दडपणही आले होते. मात्र नीट आणि काळजीपूर्वक मी हे चित्रीकरण केले. खूपच रोमांचक अनुभव होता हा. येत्या नवीन वर्षात हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येईल. माझा स्टंट आणि गाणे प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.''
२०१९ हे वर्ष श्रेयश जाधवसाठी खूप खास होते. याच वर्षी श्रेयशचे 'मी पण सचिन' चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शनात पदार्पण झाले. शिवाय याच वर्षात एक रॅप सॉन्ग सुद्धा आले, ज्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आता या आगामी गाण्यालाही प्रेक्षक असाच भरभरून प्रतिसाद देतील, हे नक्की!