बुधवार, 29 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: कोल्हापूर , सोमवार, 25 एप्रिल 2022 (21:17 IST)

पहिले मराठी चित्रपट निर्माता संमेलन बुधवारी

devendra more
अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या वतीने पहिले मराठी चित्रपट निर्माता संमेलन बुधवार 27 एप्रिल रोजी केशवराव भोसले नाटय़गृहात होणार आहे. सकाळी 10.30 वाजता संमेलनाचे उद्घाटन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते होणार आहे. तर संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्य सांस्कृतिकमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर याहेत. संमेलनाध्यक्ष भास्करराव जाधव, कार्याध्यक्ष ऍड. मोहनराव पिंपळे आहेत, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष देवेंद्र मोरे यांनी प्रेस क्लब येथील आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
 
अध्यक्ष मोरे म्हणाले, मराठी चित्रपट निर्माता संमेलनात बुधवारी सकाळी 7.30 वाजता कॅमेरा स्तंभापासून चित्र दिंडीला सुरूवात होणार आहे. या दिंडीची सांगता संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृहात होईल. उद्घाटनानंतर दुपारी 12.30 वाजता विविध 20 पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. यामध्ये भास्करराव जाधव यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. निर्मार्ते प्रसाद सुर्वे, विलास रकटे, मोहनराव पिंगळे, विजय शेदे यांना चित्रभूषण पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. सतीश रणदिवे, प्रमोद शिंदे, अशोक जाधव, ग्यना नरसिगानी, आर. के. मेहता, पी. वाय. कोळी, संजय दीक्षित, श्याम बाळकृष्णन. कै. यशवंत भालकर, कै. चंद्रकांत जोशी, कै. रविंद्र पन्हळकर, कै. प्रकाश हिलगे, सुभाष हिलगे (संयुक्त), कै. गिरीष उदाळे, सुरेश उदाळे (संयुक्त), कै. गणेश जाधव, कै. जी. जी. भोसले, कै. मनोहर रणदिवे, कै. शांताराम चौगुले, सागर चौगुले (संयुक्त), कै. जयसिंग माने यांना चित्रगैरव (मरणोत्तर) पुरस्कार देवून गौरविले जाणार आहे. दुपारी 2.15 वाजता मराठी चित्रपट धोरण विषयावर चर्चा होणार आहे. दुपारी 4 वाजता खुली चर्चा होईल. सायंकाळी 6.15 वाजता मनोरंजनाचा बहारदार कार्यक्रम होईल.
 
गुरूवार 28 एप्रिल रोजी सकाळी 9.15 वाजता ‘माझ्या गाण्याची जन्म कथा विषयावर गीतकार बाबासाहेब सौदागर सादर करणार आहेत. दुपारी 12 वाजता ‘चित्रपट खरेदी विक्री व वितरण परिषद’या विषयावर खुले अधिवेशन होणार आहे. या संमेलनात चर्चासत्रात चर्चा करून चित्रपट धोरण शासनाला सादर केले जाणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार राहुल शेवाळे, कामगार मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार संजय मंडलिक, काँग्रेस महासचिव देवानंद पवार, डॉ. नानाजीभाई स्विमजीभाई ठक्कर ठाणावाला यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी या संमेलनाला जास्तीत जास्त कलाकारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महामंडळाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष विजय शिंदे यांनी केले आहे. यावेळी किसनराव कुराडे, भरत लाटकर, चंद्रकांत सावंत, सतीश बिडकर, श्रीकांम गावकर, रंगराव कोटकर आदी उपस्थित होते.