शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 एप्रिल 2022 (15:57 IST)

‘चंद्रमुखी’च्या 'बाई गं...'ची प्रेक्षकांना भुरळ

chandramukhi
'चंद्रमुखी'ची नवी लावणी चुकवणार प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका
 
'चंद्रमुखी'तील 'चंद्रा'ने आपल्या ठसकेबाज लावणीने सर्वांना घायाळ केल्यानंतर आता चित्रपटातील आणखी एक लावणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. गुरू ठाकूर यांनी शब्दबद्ध केलेल्या 'बाई गं...'ही बैठकीची लावणीला अजय-अतुल यांचं संगीत लाभलं आहे. तर, आर्या आंबेकर हिच्या सुमधूर आवाजाने गाण्याची रंगत वाढवली आहे. विशेष म्हणजे या गाण्याच्या निमित्ताने आर्याने प्रथमच अजय-अतुल सोबत काम केलं आहे. 'लावणीकिंग' म्हणून चर्चेत असणाऱ्या आशिष पाटील यांनी या लावणीचं नृत्य दिग्दर्शन केलं असून, अमृताच्या नृत्य आणि सौंदर्याने या गाण्याला रंगत आणली आहे. 

प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या या लावणीबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक प्रसाद ओक सांगतात की, "बाई गं... ही एक बैठकीची लावणी असल्यामुळे ती कशी चित्रित करायची यावर आमच्या टीमसोबत चर्चा सुरू असताना, आमचे सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे यांनी या गाण्यासाठी अमृता काळ्या रंगाच्या नऊवारीवर हे सादरीकरण करणार आणि तिच्या खोलीतही अंधार असणार असं सांगितल्यावर सगळेच थोडे बुचकळ्यात पडतो. काही प्रमाणात चर्चा झाल्यानंतर काळी साडी आणि अंधारी खोली यावर आमचं एकमत झालं. संजय यांच्यावर विश्वास होताच, आणि तो पुन्हा एकदा सार्थ ठरला तो चित्रीकरणाच्या दिवशी... चंद्राचा संपूर्ण महाल समया, पणत्या, लामणदिव्यांनी सजवला. दिव्यांच्या लखलखाटात, अमृता जेव्हा काळी साडी नेसून आली तेव्हा सुमारे पावणे दोनशे लोकांचे युनिट तिच्याकडे एकटक बघत राहिले. तिच्यावर पडणारा तो दिव्यांचा प्रकाश तिचे सौंदर्य अधिकच तेजस्वी करत होते. सर्व युनिट त्यावेळी भारावून गेले होते. अमृताचं ते रूप आम्हा सगळ्यांच्या आजही डोळ्यांसमोर आहे आणि या सगळ्यामुळेच चित्रपटातील हे माझं सर्वात आवडतं गाणं आहे. प्रेक्षकांनाही हे गाणं नक्की आवडेल असा विश्वासही आहे ’’

चित्रपटाचे निर्माते आणि 'प्लॅनेट मराठी'चे प्रमुख संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात ,"चित्रपटात बैठकीची लावणी असणारं हे आम्हाला कळल्यावर आम्हालाही त्याविषयीची उत्सुकता होती. या गाण्याच्या रेकॉर्डिंगपासून ते चित्रीकरणापर्यंतचा प्रवास हा लक्षात राहणारा आहे. हे गाणं जेवढ्या उत्तम पद्धतीने लिहिलं आणि संगीतबद्द केलं आहे. तेवढ्याच ताकदीचं चित्रीकरणही झाल्याचा मला आनंद आहे. चंद्राची ही मंत्रमुग्ध करणारी ही लावणी प्रेक्षकांना भुरळ घालणारं यात शंका नाही" अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
 
अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत फ्लाइंग ड्रॅगन एंटरटेनमेंट, येलस्टार फिल्म्स, लाइटविदिन एंटरटेनमेंट सहप्रस्तुत 'चंद्रमुखी' या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले आहे. चिन्मय मांडलेकर यांचे पटकथा-संवाद असलेल्या या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'चंद्रमुखी' या कादंबरीवर आधारित हा चित्रपट 29 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.