आयुष्यात सकारात्मकता आणणार 'गुड वाईब्स ऑन्ली'
लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर
'गुड वाईब्स ऑन्ली' या नावावरूनच आपल्याला कळलं असेल की ही वेबफिल्म किती सकारात्मकतेने भरलेली आहे. आयुष्यातील हीच सकारात्मकता लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. सिल्क लाईट फिल्म्स प्रस्तुत, जुगल राजा निर्मित, दिग्दर्शित 'गुड वाईब्स ऑन्ली' या वेबफिल्मचे पोस्टर झळकले असून यात श्रवण अजय बने, आरती केळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यापूर्वी आरजे श्रवण आणि गायिका आरती केळकर यांनी आपल्या जादुई आवाजाची भुरळ श्रोत्यांना घातली आहे आता आपल्या उत्तम अभिनयाने ते प्रेक्षकांचे मन जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत. 'गुड वाईब्स ऑन्ली'ची कथाही जुगल राजा यांचीच आहे.
दोन व्यक्तिंभोवती फिरणारी ही कथा सर्फिंग या वॉटर स्पोर्ट्सवर बेतलेली आहे. आता यात नेमकं काय पाहायला मिळणार हे वेबफिल्म आल्यावरच कळेल. परंतु नावावरून आणि पोस्टरवरून तरी यात काहीतरी उत्सुकता वाढवणारं पाहायला मिळणार हे नक्की !
या वेबफिल्मबद्दल दिग्दर्शक जुगल राजा म्हणतात, ''आपल्या आजुबाजुला सतत चांगल्या लहरींचा प्रवाह असेल तर आपले आयुष्य आपसुकच सकारात्मक होते. हेच दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या वेबफिल्ममध्ये केला आहे आणि यासाठी आम्हाला प्लॅनेट मराठीची साथ लाभली आहे. याहून चांगलं काही असूच शकत नाही. मला खात्री आहे, हा विषय प्रेक्षकांना आवडेल.'' तर प्लॅनेट मराठी ओटीटीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, '' आम्ही नेहमीच प्रेक्षकांना वेगवेगळे विषय दिले. या वेबफिल्मची संकल्पनाही खूप वेगळी आहे. सर्फिंग या विषयावर चित्रपट बनू शकतो, ही संकल्पनाच मुळात मराठी सिनेसृष्टीसाठी नवीन आहे. आतापर्यंत पाश्चिमात्य चित्रपटांमध्ये आपण हा विषय अनेकदा पाहिला आहे. प्रथमच हा विषय मराठी चित्रपटात हाताळण्यात आला आहे.