शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 ऑगस्ट 2018 (14:43 IST)

“झांगडगुत्ता” सिनेमाचे पोस्टर रिलीज...

मराठी विनोदवीरांचा झांगडगुत्ता २१ सप्टेंबर रोजी 
 
व्हिजन कॉर्पोरेशन लि. प्रस्तुत, फुटप्रिंट मिडीया एंटरटेनमेंट, पवन शेठ, मोरेश्वर संखे निर्मित, विकी हाडा सह-निर्मित आणि संदीप मनोहर नवरे लिखित दिग्दर्शित “झांगडगुत्ता” सिनेमा २१ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. झांगडगुत्ता हे नावंच मुळी थोडं परिचयाचं नसल्याने गेल्या काही दिवसांपासून या सिनेमाच्या नावाबद्दल खूप उत्सुकता वाढली होती. आता या सिनेमाची पहिली झलक म्हणजेच पोस्टर प्रदर्शित झाले आहे. 
झांगडगुत्ता सिनेमात मराठीमधील नावाजलेले, असंख्य विनोदवीर एकत्रित आले आहेत. जयंत सावरकर, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, किशोर चौगुले, संजय खापरे, किशोरी शहाणे, माधवी जुवेकर, विजय कदम, जयवंत वाडकर, सिद्धेश झाडबुके, सुधीर निकम, अंशुमाला पाटील, नागेश भोसले, संजय कुलकर्णी, सुनील गोडबोले, सौरभ आरोटे, राजकुमार कनोजिया, अंजली लोंढे, वेदिका ढेबे, डॉ. संदीप पाटील, तुकाराम बिडकर, उज्वला गायकवाड इ. विनोदवीरांची फौज या सिनेमात बघायला मिळणार आहे. काय आहे हा झांगडगुत्ता नक्की ? सिनेमाचे संगीतकार बबली हक असून गीतकार सचिन अंधारे आहेत तर कार्यकारी निर्माता नानालाल कवाडीया (पिंटू).
 
झांगडगुत्ता हा विदर्भीय शब्द आहे. त्याचा अर्थ सावळा गोंधळ. ही गोष्ट आहे विदर्भातील दरसवाडी गावातली. या गावामध्ये प्रत्येकाला गावचा विकास करायचा आहे. पण त्यासाठी कोणीही पुढाकार घेताना दिसत नाही. आज-काल श्रेय घेण्याच्या आणि पुतळे –स्मारकं बांधण्याच्या कुरघोडीवर, त्यांच्या मानसिकतेवर विनोदाच्या अंगाने केलेली मिश्कील टिपणी म्हणजे झांगडगुत्ता. जिथे प्रत्येक जण आपले अस्तित्व, स्वार्थ टिकवण्यासाठी मेलेल्या माणसाचा पण विचार करत नाही अशा मानसिकतेवर हा सिनेमा बोट ठेवतो. माणूस मेला तर त्याच्या मागे त्याचा मित्र-परिवार फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करतात. माणूस तर गेला आता त्याच्या मागे वेळ घालवून काय फायदा, जग किती “प्रॅक्टिकल” असते हे माणूस गेल्यावर कळतं. मेलेल्या माणसाच्या दु:खात शोकाकुल झालेल्या खोट्या माणसांचा वास्तववादी विदर्भीय विनोदी चित्रपट म्हणजे झांगडगुत्ता.