’विशू’चेअव्यक्त मन व्यक्त करणार ‘रे मना’ See Video
दोन विभिन्न स्वभावाच्या व्यक्तींची हळुवार खुलत जाणारी प्रेमकहाणी आपल्याला 'विशू' मध्ये पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. ट्रेलरला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता 'विशू' चित्रपटातील 'रे मना' हे प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याला मंगेश कांगणे यांनी शब्दबद्ध केले असून या गाण्याला नेहा राजपाल हीच सुमधुर आवाज लाभला आहे. तर ह्रषिकेश कामेरकर यांनी या गाण्याला संगीत दिले आहे.
'रे मना' हे गश्मीर महाजनी आणि मृण्मयी गोडबोले यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्यात गश्मीर आणि मृण्मयी यांच्यातील अव्यक्त प्रेम नजरेने व्यक्त करत आहेत. या गाण्याचे बोल अतिशय सुंदर असून प्रेमाच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून देणारे हे गाणे आहे.
या गाण्याबद्दल चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक मयूर मधुकर शिंदे म्हणतात, 'नकळत झालेल्या प्रेमाची जाणीव करून देणारे हे गाणे आहे. या गाण्यात गश्मीर आणि मृण्मयी प्रेमाची न बोलता कबुली देत आहेत. या गाण्यामुळे प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची उत्सुकता अधिकच वाढेल. शहरी जीवनशैलीत वाढलेली आरवी जेव्हा गावातील लग्नातही तितकीच समरस होऊन जाते. इतकी मालवणची तिच्यावर जादू झाली आहे. कोकणातील लग्नघर कसे असते, याचेही या गाण्याच्या निमित्ताने दर्शन घडतेय.''
श्री कृपा प्रॉडक्शन्स प्रस्तुत बाबू कृष्णा भोईर निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन, लेखन मयूर मधुकर शिंदे यांनी केले आहे. या चित्रपटात गश्मीर महाजनी, मृण्मयी गोडबोलेसोबत ऐताशा संझगिरी, मानसी मोहिले, मिलिंद पाठक, विजय निकम, संजय गुरबक्शानी, प्रज्ञेश डिंगोरकरही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 'विशू' हा चित्रपट ८ एप्रिलपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.