रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 डिसेंबर 2018 (16:54 IST)

स्वप्नांचा माग घेणारा 'मी पण सचिन'

क्रिकेट हा मुळातच अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय. त्यातही क्रिकेट आणि सिनेमा या दोन गोष्टी जर एकत्र आल्या तर मनोरंजनाची उत्सुकता अधिकच वाढते. 
 
काही दिवसांपूर्वी 'मी पण सचिन' या सिनेमाचं पोस्टर सोशल नेटवर्किंग साईटवर झळकलं होतं. त्याला अल्पावधीतच भरघोस प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर या चित्रपटात काय पाहायला मिळणार याची उत्सुकताही अनेकांना लागून राहिली होती. आता या चित्रपटाचा जबरदस्त टीझरही सोशल नेटवर्किंग साईटवर लाँच करण्यात आला आहे. 'डोन्ट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम' अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटात स्वप्नील जोशी क्रिकेटपटूची भूमिका साकारताना दिसतोय. खेळ असो, नाहीतर आयुष्य, शेवटचा टप्पा पडल्याशिवाय कधीही हार मानायची नाही, असा प्रेरणादायी संदेश या टीझरमधून देण्यात येत आहे. गावात राहूनही लंडनच्या लॉर्ड्स ग्राउंडवर क्रिकेट खेळण्याचं स्वप्न उराशी बाळगून, त्या मार्गानं प्रयत्न करणाऱ्या स्वप्निलच्या आयुष्यात काही विचित्र घडामोडी घडत असल्याचं या टीझरमधून दिसत आहे. त्यामुळे स्वप्नीलचं हे स्वप्न पूर्ण होतंय, की अधुरं राहतंय, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. 
 
इरॉस इंटरनॅशनल आणि एव्हरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत आणि गणराज असोसिएट निर्मित 'मी पण सचिन' चित्रपट येत्या १ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. नीता जाधव आणि गणेश गीते या चित्रपटाचे निर्माता असून श्रेयश जाधव यांनी लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. श्रेयश जाधव यांनी या आधीही आपल्या चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण विषय हाताळले आहेत, त्यामुळे या चित्रपटातूनही प्रेक्षकांना काहीतरी नवीन पाहायला मिळेल, यात शंका नाही. इरॉस इंटरनेशनलद्वारे 'मी पण सचिन' या चित्रपटाचे जागतिक स्तरावर वितरणही केले जाणार आहे.