बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 22 एप्रिल 2019 (15:30 IST)

स्वप्नील जोशी आणि संदीप पाठक पहिल्यांदाच ‘मोगरा फुलला’मध्ये एकत्र

‘जीसिम्स’ निर्मित आणि श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘मोगरा फुलला’ या स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेल्या मराठी चित्रपटातील नायकाच्या म्हणजे स्वप्नीलच्या मित्राची भूमिका चतुरस्र अभिनेता संदीप पाठक साकारत आहे. या चित्रपटात तो सॉफ्टवेअर व्यावसायिकाच्या  भूमिकेत दिसणार आहे. ‘मोगरा फुलला’ १४ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
 
नाजूक नात्यांचा गुंफलेला हा गजरा म्हणजेच ‘मोगरा फुलला’! या भावनिक चित्रपटातील नायकाच्या म्हणजे सुनील कुलकर्णीच्या मित्राची भूमिका संदीप पाठक साकारत आहे. हा सुनीलचा खूपच चांगला मित्र आहे, असे हे पात्र आहे. आपण नेहमीच इच्छित असलेल्या कोणत्याही चांगल्या मित्रासारखे या दोघांचे नाते आहे. सॉफ्टवेअरच्या व्यवसायामध्ये या दोन मित्रांची भागीदारी सुद्धा आहे. सुनील कुलकर्णी सारख्या मित्राला मदत करायला हा मित्र नेहमी तयार असतो.    
 
सोपं काम अवघड करणारे मित्र कठीण असतात... या टॅगलाइनसह नुकतेच एक पोस्टर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रकाशित केले आहे. त्यात स्वप्नील आणि चित्रपटात त्याचा मित्र बनलेला संदीप पाठक यांचा वेगळाच लुक यामध्ये बघायला मिळत आहे. वेगळ्या गेटअपमधील संदिप पाठक तर या फोटोमध्ये कमालीचा वेगळा दिसत आहे. या दोघांची केमिस्ट्री यातून व्यक्त होत असून, त्यांच्यातील मैत्रीचा पोत त्यातून अधोरेखित होतो.
 
आपली भूमिका आणि अभिनयाविषयी बोलताना संदीप पाठक म्हणाला की ‘मला अभिनेता म्हणून नेहमी असं वाटतं की चांगल्या कथानकात आपला सहभाग असावा, प्रत्येक पात्राला महत्व असलेला सिनेमा करायला मिळावा. उत्तम दिग्दर्शक, अनुभवी कलाकारांसोबत काम करता यावं, दर्जेदार प्रोजेक्टमधे आपला खारीचा वाटा असावा, माझ्या ह्या सगळ्या इच्छा  "मोगरा फुलला" या सिनेमातून पूर्ण होत आहेत हे मी प्रेक्षकांना, वाचकांना नककी सांगु शकतो. मला ही संधी श्रावणीताई देवधर, स्वप्नील जोशी, कार्तिक सर आणि जीसिम्स प्रॉडक्शन्सने दिली’. 
 
संदीप पाठक याने हरिश्चंद्राची फॅक्टरी, एक डाव धोबीपछाड, शहाणपण देगा देवा आणि एक हजाराची नोट यांसारख्या गाजलेल्या अनेक चित्रपटांतून अभिनय केला आहे. तर फू बाई फू, घडलंय बिघडलंय, असंभव, एका लग्नाची दुसरी गोष्ट, अशा अनेक मालिकांतून त्यांनी काम केले आहे. तसेच ‘असा मी असामी, लग्नकल्लोळ, जादू तेरी नजर, ज्याचा शेवट गोड, सासू माझी धांसू' या नाटकांतून अभिनय केला आहे. ‘वऱ्हाड निघालंय लंडनला' या नाटकाच्या एकपात्री प्रयोगातून संदीप पाठक आपल्याला बघायला मिळाले आहेत. या त्यांच्या अभिनयामुळे एक चतुरस्र अभिनेता अशी संदीप पाठक यांची ओळख बनली आहे.
 
या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी आणि संदिप पाठक यांच्याबरोबर चंद्रकांत कुलकर्णी, सई देवधर, नीना कुळकर्णी, सुहिता थत्ते, समिधा गुरु, विघ्नेश जोशी, संयोगिता भावे, दीप्ती भागवत, प्राची जोशी, सानवी रत्नालीकर, आनंद इंगळे, आशिष गोखले, प्रसाद लिमये, हर्षा गुप्ते, सोनम निशाणदार, सिद्धीरूपा करमरकर, माधुरी भारती, सुप्रीत कदम, अनुराधा राजाध्यक्ष आणि आदित्य देशमुख या आघाडीच्या कलाकारांच्याही भूमिका आहेत.
 
‘जीसिम्स’च्या अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक निशाणदार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘जीसिम्स फिल्म्स’ने आतापर्यंत अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यात फुगे, तुला कळणार नाही, रणांगण यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे, स्टार प्रवाह वरील ‘नकळत सारे घडले’ या मालिकेची निर्मिती त्याचबरोबर ‘भिकारी’ या चित्रपटची प्रस्तुती देखील ‘जीसिम्सने केली आहे. भारतीय चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपन्यांमधील एक अग्रणी कंपनी असलेल्या ‘पॅनोरमा स्टुडिओज’ने ‘मोगरा फुलला’च्या वितरणाची जबाबदारी घेतली आहे.
 
प्रख्यात दिग्दर्शिका श्रावणी देवधर या बऱ्याच वर्षांनी ‘मोगरा फुलला’च्या माध्यमातून दिग्दर्शनाकडे परत वळल्या आहेत. त्यांनी याआधी अनेक गाजलेले चित्रपट दिग्दर्शित केले होते. त्यांमध्ये लपंडाव, सरकारनामा, लेकरू या मराठी चित्रपटांचा समावेश आहे. त्यांना फिल्मफेअर आणि स्क्रीन यांसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. ‘मोगरा फुलला’ला स्वतःचा असा वेगळा ‘टच’ देण्यास त्या सज्ज झाल्या आहेत.