शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 17 ऑक्टोबर 2023 (16:08 IST)

GADKARI : ‘गडकरी’मधून उलगडणार नितीन गडकरी यांचा जीवनप्रवास

gadkari
‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ अशी ओळख असणाऱ्या नितीन जयराम गडकरी यांच्या जीवनावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच नागपूर येथे दिमाखात पार पडला. या वेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय क्रिकेटर उमेश यादव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी चित्रपटात नितीन गडकरी यांची भूमिका साकारणाऱ्या राहुल चोपडा यांनी ‘गडकरी’ शैलीने उपस्थित राहून प्रेक्षकांची मने जिंकली. अभिजीत मजुमदार आणि ए एम सिनेमा प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित ‘गडकरी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले आहे. देशाच्या विकासासाठी कायमच कटिबद्ध असणाऱ्या नितीन गडकरी यांची भूमिका राहुल चोपडा यांनी साकारली असून या चित्रपटात ऐश्वर्या डोरले, अभिलाष भुसारी, पुष्पक भट, अभय नवाथे, वेदांत देशमुख, तृप्ती प्रमिला काळकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. अनुराग भुसारी यांची कथा, पटकथा असलेल्या या चित्रपटाचे अनुराग भुसारी, मिहिर फाटे सहनिर्माते आहेत.
 
 ट्रेलरमध्ये ‘गडकरी’ ते ‘रोडकरी’चा प्रवास दिसत आहे. नितीन गडकरी यांचा हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. त्यांच्या या कारकिर्दीतील चढ उतार ट्रेलरमध्ये दिसत आहेत. त्यांचे राजकीय आणि खासगी आयुष्य या चित्रपटातून उलगडणार आहे. ‘जिथे इच्छा आहे तिथे मार्ग आहे’ असे मानणाऱ्या ‘गडकरी’ यांचा असामान्य प्रवास 27 ॲाक्टोबरपासून प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहाता येणार आहे. या चित्रपटाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, '' ही आपल्या सगळ्यांसाठीच आनंदाची गोष्ट आहे की, नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारित 'गडकरी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिजीत मजुमदार, दिग्दर्शक अनुराग भुसारी, अक्षय देशमुख आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमने नितीनजींचे आयुष्य आपल्या समोर आणले आहे. त्यामुळे त्यांच्या टीमला आणि कलाकारांना मनापासून धन्यवाद देतो. एक सुंदर चित्रपट तुम्ही तयार केला. याचा ट्रेलर बघून आमच्या सगळ्यांच्याच मनात हा चित्रपट पाहाण्याची उत्कंठा आहे. 
 
 नितीनजींच्या जीवनातील विविध प्रसंग, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे कंगोरे हे तीन तासांमध्ये बांधणे कठीण आहे. नितीन गडकरी एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांचे आयुष्य एका भागात दाखवणे शक्य नाही त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की याचा दुसरा भागही लवकरच प्रदर्शित व्हावा.'' भारतीय क्रिकेटर उमेश यादव म्हणाले, '' नितीन गडकरी यांचे कार्य अनन्यसाधारण आहे. नागपूरमध्ये ज्यावेळी हायवे झाले, त्यावेळी क्रिकेटर एम एस धोनीनेही त्यांच्या या कल्पनेचे स्वागत केले. भारताला विकासाच्या दिशने नेण्याचे काम नितीन गडकरी यांनी केले आहे. त्यांच्या आयुष्यावर हा चित्रपट व्हावा, ही खूप आनंदाची बाब आहे. प्रत्येकाने आपल्या कुटुंबासोबत हा चित्रपट पाहावा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चित्रपट पोहोचला पाहिजे. जेणे करून तरुणाईला एक आदर्श समाजसेवक, नेता काय असतो, याची ओळख होईल.'' चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अनुराग राजन भुसारी म्हणतात, ‘’ दूरदृष्टीचा विचार करून सदैव कार्यरत असणाऱ्या नितीन गडकरी यांचे देशकार्य, समाजकार्य आपल्या सर्वांनाच माहित आहे. त्यांची व्यावसायिक कारकिर्द जितकी कौतुकास्पद आहे तितकेच रंजक त्यांचे वैयक्तिक आयुष्यही आहे. नितीन गडकरी आपल्या देशाला प्रगतीपथावर नेत असतानाच त्यांच्या पत्नीने म्हणजेच कांचनताईंनी त्यांच्या घराचा डोलारा यशस्वीरित्या सांभाळला. त्यांच्या या यशात कांचनताईंचीही तितकीच मोलाची साथ आहे. गडकरी यांचे मित्रही तितकेच त्यांच्या या यशासाठी कारणीभूत आहेत. नितीन गडकरी यांचा सामान्य मुलगा ते यशस्वी राजकारणी हा प्रवास ‘गडकरी’मध्ये दाखवण्यात आला आहे. प्रेक्षकांना या निमित्ताने नितीन जयराम गडकरी यांना जवळून जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांनी अवश्य पाहावा.’’