सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 27 ऑक्टोबर 2021 (21:01 IST)

'ओव्यांच्या खजिन्या’ने दिवाळी होणार चैतन्यदायी

दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळी म्हणजे दिव्यांची रोषणाई, रांगोळी, फराळ आणि एकमेकांना दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू. या दिवाळीत अशीच एक अमूल्य भेटवस्तू 'प्लॅनेट मराठी ओटीटी' आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. दिवाळी हा जसा आपल्या संस्कृती आणि परंपरेचा अविभाज्य भाग आहे, तशीच एक अमूल्य आणि आपल्या मराठी संस्कृतीचा ठेवा असणारी एक गोष्ट आपण विसरत चाललो आहोत. ती म्हणजे शेकडो वर्षांपासून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला अगदी वारसा हक्काने मिळणाऱ्या आणि आपला इतिहास चालीत गुंफणाऱ्या आपल्या ओव्या. या ओव्यांचा गोडवा आजच्या तरुणपिढीसोबतच सगळ्या मराठी प्रेक्षकांना कळावा, यासाठी 'प्लॅनेट मराठी ओटीटी' आपल्या प्रेक्षकांसाठी 'ओव्यांचा खजिना' घेऊन येत आहे. या 'ओव्यांचा खजिन्या'त प्रेक्षकांना तब्बल २३ प्रकारच्या विविध ओव्या ऐकायला तसेच पाहायला मिळणार आहेत. या सर्व ओव्यांचे दिग्दर्शन ज्योती शिंदे यांनी केले असून समीरा गुजर-जोशी हिने आपल्या गोड आवाजात या ओव्यांचे वाचन तसेच विश्लेषण केले आहे. अनेक वर्षांपासून अजरामर ठरलेल्या परंतु आता कालबाहय होऊ पाहणाऱ्या या ओव्यांमधून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. या ओव्यांमध्ये आपल्या इतिहासातील अनेक संदर्भ लपलेले आहेत. या दिपावलीत ओव्यांच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीची आपल्याला नव्याने ओळख होईल. ‘ओव्यांचा खजिना’ या पारंपरिक कार्यक्रमातून मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींचा सुंदर अभिनय प्रेक्षकांना पाहाता येणार आहे. त्यामुळे एकंदरच यंदाची दिवाळी अधिकच समृद्ध आणि चैतन्यमय होणार.
 
'ओव्यांचा खजिन्या'बद्दल 'प्लॅनेट मराठी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, '' दिवाळी येत आहे. सर्वत्र उत्साहाचे, आनंदाचे वातावरण आहे. आपल्या परंपरेच्या आणि संस्कृतीच्या अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आपण हळूहळू विसरत चाललो आहोत. या गोष्टींचे जतन करायलाच हवे. त्यापैकीच एक असलेल्या ओव्या. म्हणूनच यंदाच्या दिवाळीत 'ओव्यांचा खजिना' आपल्या रसिक प्रेक्षकांसाठी 'प्लॅनेट मराठी ओटीटी' घेऊन येत आहे. यात अनेक प्रकारच्या ओव्या आहेत ज्या आपल्या इतिहासाशी आपली नाळ जोडतील. आपली मराठी संस्कृती जपण्याचा आमचा हा प्रयत्न आहे.''