शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (18:48 IST)

'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर रंगणार गाण्यांची मैफल

संगीत हे एखाद्या योग साधनेप्रमाणे आहे. संगीतामुळे आपले मन आनंदी होते. असे हे जादुई किमया असलेले संगीत लवकरच 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर प्रेक्षकांसाठी उपलब्ध होणार आहे. 'प्लॅनेट मराठी ओटीटी' सुरु झाल्यापासून त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अनेक नवनवीन आणि वेगवेगळ्या विषयांवरील वेबसीरिज आणि चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले असून ते पाहाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातच आता 'प्लॅनेट मराठी संगीत' हा नवीन विभाग 'प्लॅनेट मराठी ओटीटी'च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या विभागात संगीतप्रेमींना पारंपरिक तसेच आधुनिक, चित्रपटातील आणि चित्रपटांव्यतिरिक्त, एक्सक्लुझिव्ह, नॉन-एक्सक्लुझिव्ह अशा विविध प्रकारांची गाणी ऐकायला मिळणार आहेत. प्लॅनेट मराठीची निर्मिती असलेल्या गाण्यांचाही आनंद संगीतरसिक घेऊ शकणार आहेत. या विभागाअंतर्गत ‘रिमझिम रिमझिम’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून गाण्याचे बोल आणि संगीत आशिष विळेकर यांचे आहे तर प्रीती जोशी यांनी हे गायले आहे. 'प्लॅनेट मराठी संगीत' या विभागात कॅराओके, फोक स्टुडिओ, म्युझिक कॉन्सर्ट्स, सांगितिक मैफिलींचा श्रोत्यांना आनंद घेता येणार आहे. वैशिष्ट्य म्हणजे आधुनिकतेकडे वाटचाल करतानाच आपली परंपरा जपून ती सातासमुद्रापार नेण्याचा प्रयत्न 'प्लॅनेट मराठी' ओटीटी सुरुवातीपासूनच करत आहे. त्यामुळेच या संगीत विभागात प्रामुख्याने ओव्यांचाही सहभाग करण्यात आला आहे. पुढील आठवड्यात तब्बल २५ गाणी 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर उपलब्ध होणार असल्याने संगीतप्रेमींचे आता भरभरून मनोरंजन होणार हे नक्की.
 
'प्लॅनेट मराठी संगीत' या विभागाबद्दल 'प्लॅनेट मराठी ओटीटी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ''प्रेक्षकांचे मनसोक्त मनोरंजन करणे हेच 'प्लॅनेट मराठी'चे ध्येय आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन कसे करता येईल? त्यांना काय नवीन देता येईल? याचाच विचार आम्ही करत असतो. हा विचार करतानाच कुठे आपली संस्कृती, परंपरा मागे पडणार नाही, हे आम्ही नेहमीच लक्षात ठेवतो आणि म्हणूनच संगीत खजिना प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतानाच त्यात आपली परंपरा असणाऱ्या ओव्यांचा आम्ही आवर्जून समावेश केला आहे. मराठी प्रेक्षक आशय निवडीच्या बाबतीत सुजाण असल्याने त्यांना उत्तम आशय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रेक्षकांना दिलेल्या वचनानुसार 'प्लॅनेट मराठी संगीत' हा नवीन विभाग लवकरच त्यांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी आलेल्या 'प्लॅनेट मराठी सिनेमा' , टॉक शो, विविध विषयांवरील वेबसीरिज यांना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांच्या या प्रतिसादामुळे नवनवीन गोष्टी करण्याचे बळ आम्हाला मिळते. 'प्लॅनेट मराठी संगीत' हा विभागही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल याची खात्री आहे.''