सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 12 ऑगस्ट 2021 (18:29 IST)

PLANET MARATHI - JOBLESS - ‘जॅाबलेस’ झालात? कोणता मार्ग निवडणार?

आयुष्य जगण्यासाठी माणसाच्या काही गरजा असतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी पैसा हा लागतोच. आणि त्यासाठीच प्रत्येक व्यक्ती नोकरी, बिझनेस करतो. सर्व काही सुरळीत सुरु असताना काही कारणास्तव जॉब गेला तर? बिझनेस ठप्प झाला तर? अशा वेळी संपूर्ण आयुष्याचे गणितच बिघडून जाते. माणसाची मानसिक स्थिती ढासळू लागते आणि पैसे कमावण्याच्या नादात, उतावळेपणात अनेकदा चुकीचा निर्णयही घेतला जातो. या एका चुकीच्या निर्णयातून आयुष्य कसे उद्ध्वस्त होऊ शकते, ही दाखवणारी वेबसिरीज लवकरच 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर येत आहे. 'जॉबलेस' असे या वेबसिरीजचे नाव असून सुव्रत जोशी, पुष्कर श्रोत्री प्रमुख भूमिकेत असून निरंजन पत्की दिग्दर्शक आहेत. 
 
'जॉबलेस'चा ट्रेलर सोशल मिडीयावर प्रदर्शित झाला असून महामारीच्या कठीण काळात सुव्रत 'जॉबलेस' का होतो? पैसे मिळवण्यासाठी तो वाईट मार्गाचा अवलंब करतो का? या अडचणीतून तो बाहेर येतो का? असे अनेक अनुत्तरित प्रश्न 'जॉबलेस'मधून उलगडणार आहेत. 
 
'जॉबलेस' बद्दल 'प्लॅनेट मराठी ओटीटी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ''सद्यस्थितीवर आधारित ही वेबसिरीज आहे. कोरोनामुळे अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. हा ज्वलंत विषय 'प्लॅनेट मराठी ओटीटी' ने 'जॉबलेस' या वेबसिरीजमधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. नोकरी गेल्याने अनेक जण तणावपूर्ण जीवन जगत आहेत आणि त्यातूनच मग चुकीचे पाऊल उचलले जाते. एक चूक सावरताना हातून अनेक चुका होतात आणि संपूर्ण आयुष्य बदलून जाते. या कठीण परिस्थितीवर भाष्य करणारी ही वेबसिरीज आहे. यातून प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी बोध मिळेल. ही वेबसिरीज प्रेक्षकांना ३१ ऑगस्टपासून 'प्लॅनेट मराठी ओटीटी' अतिशय अल्प दरात पाहता येईल.''