सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 ऑगस्ट 2021 (15:47 IST)

मनोरंजनाचा खजिना घेऊन ‘प्लॅनेट मराठी ओटीटी' येतेय ॲागस्टमध्ये

आपल्याकडे मराठी साहित्याचे भंडार आहे आणि याच मराठी साहित्याला मनोरंजनच्या माध्यमातून योग्य न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने 'प्लॅनेट मराठी ओटीटी' सुरु करण्यात आले आहे. साहित्याचा समृद्ध वारसा लाभलेल्या आपल्या या मायमराठीला सातासमुद्रापार पोहोचवणारे 'प्लॅनेट मराठी' हे मराठीतील पहिलेवहिले ओटीटी असून अखेर ऑगस्टमध्ये ते अधिकृतरित्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या पूर्वी 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर जगभरातील विविध फिल्म फेस्टिवलमध्ये हजेरी लावणारा 'जून' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता 'प्लॅनेट मराठी'च्या 'जॉबलेस', 'सोपं नसतं काही', 'हिंग पुस्तक तलवार', 'बाप बीप बाप' आणि 'परीस' या वेगवेगळ्या जॉनरच्या जबरदस्त वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. 
 
इतक्या महिन्यांच्या प्रतिक्षेला आता काही दिवसांतच पूर्णविराम लागणार आहे. 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर प्रेक्षकांसाठी हजारो तासांचा मनोरंजनात्मक खजिना उपलब्ध होणार असून यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीच्या कंटेन्टचा समावेश असेल. यासाठी प्रेक्षकांना अतिशय अल्प अशी किंमत मोजावी लागणार आहे. आपली कला, संस्कृती, साहित्य यांचा आधुनिक मिलाफ आपल्याला इथे पाहायला मिळणार असून 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर प्रेक्षकांना वेबसिरीज, चित्रपट, संगीत, कराओके, कॉन्सर्ट, टॉक शो असे विविध मनोरंजनाचे विविध पर्याय उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे जगभरातील मराठमोळ्या प्रेक्षकांचे शंभर टक्के मनोरंजन होणार हे नक्की 

'प्लॅनेट मराठी ओटीटी' आणि त्याच्या वेगळेपणाबद्दल 'प्लॅनेट मराठी ओटीटी'चे प्रमुख संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ''आपली टॅगलाईनच अशी आहे, ''म मानाचा... म मराठीचा... यातच सगळे आले. प्लॅनेट मराठीच्या वेगळेपणाबद्दल सांगायचे तर हा पहिला ओटीटी प्लॅटफॉर्म आहे जिथे सर्व कंटेन्ट मराठीत असेल आणि तोसुद्धा उत्कृष्ट दर्जाचा. आपल्या मराठी साहित्याला लाभलेला वारसा जपत त्याला आधुनिक पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न 'प्लॅनेट मराठी ओटीटी', अ विस्टा मीडिया कॅपिटल कंपनीच्या माध्यमातून केला जाणार आहे. या माध्यमातून आम्ही जगभरातील मराठमोळ्या प्रेक्षकांपर्यंतही पोहोचू. तसेच चौकटीबाहेर जाऊन प्रेक्षकांना काहीतरी नाविन्यपूर्ण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुळात मराठी प्रेक्षकवर्ग हा चोखंदळ आहे. त्यामुळेच इथे नवनवीन विषय हाताळले जातील. घोषणेपासूनच आम्ही प्रेक्षकांना दर्जेदार कंटेन्ट देऊ, असा विश्वास दिला होता. ही बांधिलकी आम्ही कायमच जपू. आज 'प्लॅनेट मराठी'चा परिवार बहरत आहे. मराठी इंडस्ट्रीतील नामवंत कलाकार, दिग्दर्शक 'प्लॅनेट  मराठी'सोबत जोडले गेले आहेत. त्यांच्यासोबतच काही नवोदित कलाकारही या परिवाराशी जोडले गेले आहेत. वेबसिरीज, वेबफिल्म्स, शॉर्ट फिल्म्स, चित्रपट यांच्यासह अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रम घेऊन आम्ही लवकरच तुमच्या भेटीस येऊ.''