गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 ऑगस्ट 2017 (16:24 IST)

भारतीय चित्रपट सृष्टीत मराठी सिनेमाने केला पहिला रिले सिंगिंग गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड

रुग्ण्याच्या हितार्थ 'कटप्रॅक्टिस' बंद करण्यावर लवकरच कायदा करणार -  महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन 
 
यापूर्वीचा २९६ गायकांचा रिले सिंगिंग गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मोडत ३२७ गायकांचा नवा रेकॉर्ड प्रस्थापित झाला.   
 
वाशी मधील सिडको एक्झिबिशन सेंटरच्या सभागृहात चहू ठिकाणी उत्साहाचे वातावरण पसरले होते. तुडुंब भरलेल्या सभागृहात सगळ्यांचेच लक्ष बहुप्रतिक्षीत रिले सिंगिंग कडे लागले होते. "डॉ. तात्या लहाने ... अंगार... पॉवर इज विदीन"  ६ ऑक्टोबर २०१७ रोजी प्रदर्शित होणाऱ्या सिनेमात रिले सिंगिंग गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गायकांची निवडले गेलेले सात ते सत्तर वयोगटातील ३२७ गायक मंचावर सज्ज झाले होते. त्यांनी सिनेमातील काळोखाला भेदून टाकू जीवनाला उजळून टाकू हे १०८ शब्दांचे गाणे गाण्यासाठी सुरवात केली. असे हे लक्षवेधी रिले सिंगिंग सुरु झाल्या क्षणापासून सभागृहात उपस्थित प्रत्येक व्यक्ती काळजाच्या ठोक्यावर गाण्याचा ठेका धरत जणू आपणही या अद्वितीय उपक्रमाचा भाग असल्याचे समजत होते. जवळपास १५ मिनिटे हे गाणे सलग ३ वेळा सूर, ताल आणि लय यांची सुसूत्रता ठेवत एक शब्द एक गायक या पद्धतीने एकूण ३२७ गायकांनी गायले.  रिले सिंगिंगच्या रेकॉर्डची नोंद घेण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे पदाधिकारी स्वप्नील डांगरीकर उपस्थित होते. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घालून दिलेल्या निकष लक्षात ठेवून हा विश्वविक्रम झाल्याचे घोषित करताच सभागृहात एकच जल्लोष झाला. यावेळी प्रत्येकाचा आनंद गगनात मावेनासा होत होता. 
 
याप्रसंगी उपस्थित मान्यवर महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण गिरीश महाजन, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, कोल्हापूरचे आमदार सुजित मिणचेकर, बेलापूर मतदार क्षेत्राच्या आमदार, नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे, समाजसेवक चंद्रकुमार जाजोदिया, डॉ. विठ्ठल लहाने, व इतर मान्यवर  या विक्रमाचे साक्षीदार होते. या उपक्रमाला शुभेच्छा देताना, गिरीश महाजन म्हणाले, डॉ तात्याराव लहाने आणि माझा गेल्या २५ वर्षांचा ऋणानुबंध आहे. आम्ही दोघांनी कमी वयातच जनहितार्थ काम करण्यास सुरवात केली. चोवीस पंचविसाव्या वर्षी मी महाविद्यालय सोडल्यापासून आमदार झालो आता मंत्री आहे तर डॉ लहाने अनेक गाव खेड्यामध्ये मोफत कॅम्प घेऊन रुग्णाची सेवा अविरत सेवा करत आहेत. समाजसेवेसाठी 'ध्येयवेडा ' असणारे डॉ. लहाने खरंच आदर्श आहेत. काही लोक काम नाव किंवा पैसे कमविण्यासाठी करतात पण डॉ. लहाने. मूल्यांसाठी समाजासाठी काम करतात. त्यांचा समाजकार्यात सिंहाचा वाटा आहे. आता आम्ही विधानसभेमध्ये 'कटप्रॅक्टिस'चा कायदा आणण्याचा प्रयत्नात आहे. एखादा रुग्ण ग्रामीण भागातून शहरात पाठवला तर तालुका, जिल्हा, शहरातील हॉस्पिटल कमिशन काढतात. वाजवीपेक्षा जास्त बिल रुग्णाकडून घेऊन प्रत्येकाचा कट दिला जातो ज्यामुळे ग्रामीण भागातून आलेला रुग्ण भरडला जातो. अशा परिस्थिती डॉ. तात्याराव विनामूल्य रुग्णाची सेवा करतात त्यांच्याकडून खरंच अनेकांनी प्रेरणा घ्यावी. त्याचबरोबर अभिनेत्री अलका कुबल सिनेमात डॉ. लहाने यांच्या आईची भूमिका करत असल्या तरी त्यांच्यावर काहीसा अन्यायच झाला आहे, कारण त्या अजूनही आपल्या 'ताई' प्रमाणेच दिसतात अशी मिश्किल प्रतिक्रीया देताच सभागृहात एकच हशा पिकला.  यावेळी डॉ. लहाने म्हणाले, किडनी देऊन आईने मला पुनर्जन्म दिला त्यामुळे तो समाजासाठीच सत्कारणी लावेन हा निर्धार मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत पाळेन. या सिनेमामुळे माझ्यासारखी अनेक मंडळी समाजकार्यासाठी पुढे आली तर नक्कीच समाज पुढे जाईल. विरागने उलगडलेलं माझं चरित्र महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहोचेल यात शंका नाही. हा सिनेमा निव्वळ चरित्रपट नाही तर दिग्दर्शक विराग वानखडे यांनी पॅशिनेटली केलेली मेहनत आणि डॉक्टरांनी विरागवर टाकलेला विश्वास आहे जो नक्की सार्थ होईल अशी मार्मिक प्रतिक्रिया अभिनेत्री अलका कुबल यांनी नोंदविली. 

डॉ. तात्याराव  लहाने यांच्या कारकिर्दीला मानवंदना देणारा आणि त्यांच्या संघर्षात्मक जीवनावर दृष्टिक्षेप टाकणारा नामवंत कलाकारांचा कसदार अभिनय आणि डॉ. लहाने यांच्या आयुष्याचा आढावा घेणाऱ्या "डॉ. तात्या लहाने ... अंगार पॉवर इज विदीन" सिनेमाचे दिग्दर्शन विराग मधुमालती वानखडे यांनी केले असून त्यांच्याच विराग मधुमालती एंटरटेनमेंट अंतर्गत सिनेमाची निर्मिती केली आहे. अभिनेता मकरंद अनासपुरे डॉ लहाने यांची प्रमुख भूमिका साकारली आहे. यांच्यासोबत सिनेमात निशिगंधा वाड, भारत गणेशपुरे, रमेश देव यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. सिनेमाची कथा-पटकथा- संवाद विराग यांनी स्वतः लिहिले असून सिनेमाचं संगीत 'एक हिंदुस्थानी' या संगीतकाराने केलं आहे. निर्माता-दिग्दर्शक विराग यांच्या कठोर परिश्रमातून साकारला जाणारा हा सिनेमा ६ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.