बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (20:31 IST)

१९ नोव्हेंबरपासून चित्रपटगृहात 'झिम्मा'चा खेळ रंगणार

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा' या चित्रपटाचे टिझर प्रदर्शित झाले होते. या धमाकेदार टीझरने चित्रपटाविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढवून ठेवली होती. मात्र महामारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. परंतु आता प्रेक्षकांसाठी एक खुशखबर असून 'झिम्मा' चा खेळ आता लवकरच रंगणार आहे, ‘झिम्मा’ १९ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. चित्रपटगृहे सुरू झाल्यापासून चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणारा ‘झिम्मा’ हा पहिला मराठी चित्रपट आहे. 
 
वेगवेगळया पार्श्वभूमी, व्यक्तिमत्व असलेल्या स्त्रिया जेव्हा आपल्या सर्व जबाबदाऱ्या बाजूला ठेवून आपले आयुष्य मनमुराद जगण्यासाठी एकत्र येतात तेव्हा जी धमाल होते, ती या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. यात निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले या जबरदस्त अभिनेत्रींसोबत सिद्धार्थ चांदेकरही दिसणार आहे. 
 
  'चलचित्र कंपनी' प्रस्तुत 'अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट' आणि 'क्रेझी फ्यू फिल्म्स' निर्मित 'झिम्मा' या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांचे असून अमितराज यांचे या चित्रपटाला संगीत लाभले आहे. तर छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे. क्षिती जोग यांच्यासोबत स्वाती खोपकर, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, अनुपम मिश्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.