मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

राजाच्या चरणी झाले 'तुला कळणार नाही' चे म्युझिक लाँच

गणेशोत्सवाच्या धामधुमीत प्रदर्शित होत असलेल्या 'तुला कळणार नाही' या आगामी सिनेमाचे नुकतेच लालबागच्या राजाच्या चरणी म्युझिक लाँच करण्यात आले. गणेशभक्तांची प्रचंड गर्दी आणि विघ्नहर्त्याचे मूर्त स्वरूप असलेल्या भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या कायर्क्रमात सिनेमातील सर्व टीमने उपस्थिती लावली होती. सक्षम फिल्म्स आणि जीसिम्स प्रस्तूत तसेच सिनेकोर्न इंडियाचे सौजन्य लाभलेल्या 'तुला कळणार नाही' या सिनेमाची मराठीचा सुपरस्टार स्वप्नील जोशी सोबत, अर्जुनसिंग बरन, कार्तिक निशानदार, आणि श्रेया योगेश कदम या चौकडीने निर्मिती केली आहे. 
 
सुबोध-सोनालीची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमातील गाणी प्रेक्षकांना मोहिनी घालत आहे. नेहा राजपाल आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजातील या सिनेमाचे शीर्षकगीत प्रत्येक दाम्पत्यांना आपलेच गीत असल्यासारखे वाटत आहे. क्षितीज पटवर्धन लिखित या गाण्याचे संगीत अमितराज यांनी रचले आहे. राजाच्या चरणी अनावरण झालेल्या या सिनेमातील म्युझिक अल्बममधील अश्विनी शेंडे लिखित 'मिठीत ये', आणि'माझा होशील का' ही गाणी देखील रसिकांना आवडतील, अशी आशा आहे. पती-पत्नीच्या नात्याची नाजूक गुंफण मांडणारी हि रोमेंटिक गाणी,निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केली असून, नवदाम्पत्यांसाठी ती पर्वणी ठरणार आहे. यातील 'मिठीत ये' या गाण्याला जानवी प्रभू अरोराचा आवाज लाभला आहे, तर मिहीरा जोशी आणि स्वप्नील बांदोडकरने जोडीने 'माझा होशील का' गाण्याचे ड्युएट गायले आहेत.  स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित हा सिनेमा घराघरातील प्रत्येक नवरा-बायकोच्या नात्यावर आधारित असल्यामुळे, हा सिनेमा जणू विवाहित दाम्पत्याची बायोपिक आहे, असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.  निरव शाह, इलाची नागदा आणि जयेश मुझुमदार या सिनेमाचे सहनिर्माते असून, अनंत चतुर्दशीच्या दोन दिवसानंतर म्हणजेच येत्या ८ सप्टेंबरला मनोरंजनाची जय्यत मेजवानी हा सिनेमा देणार आहे.