‘विक्की वेलिंगकर’ ६ डिसेंबर २०१९ रोजी होणार प्रदर्शित
अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार व प्रणय चोकसी आणि डान्सिंग शिवा प्रस्तुत मराठी चित्रपट ‘विक्की वेलिंगकर’ या चित्रपटातील सोनाली कुलकर्णी आणि ‘मास्क मॅन’ यांचा वेगळा लुक काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता, त्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला असून नुकतेच निर्मात्यांनी सिनेमाचे नवीन पोस्टर प्रदर्शित केले आहे. यातून एक नवीन चेहरा प्रेक्षकांच्या समोर आला आहे. या पोस्टरमध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशी दिसत असून तिचा वेगळा लूक पाहायला मिळत आहे. ‘विक्की वेलिंगकर’ हा मराठी चित्रपट ६ डिसेंबर २०१९ रोजी होणार प्रदर्शित होणार असून या चित्रपटात स्पृहा जोशीची देखील मुख्य भूमिका प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
‘विक्की वेलिंगकर’ ही कॉमिक पुस्तकातील व्यक्तिरेखा असून तो एक घड्याळ विक्रेता आहे. आयुष्यातील एका अनपेक्षित अशा गूढतेशी या व्यक्तिरेखेचा सामना होतो. या चित्रपटाची नायिका ही आपल्या सर्व आव्हानांवर आणि अडचणींवर मात करत खंबीरपणे उभे राहते, तिची ही कथा आहे, त्याचबरोबर स्पृहा जोशी या चित्रपटामध्ये विद्या नावाचे पात्र साकारत असून ‘ती विक्कीला वाचवू शकेल?' या आशयाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. यामुळे प्रेक्षकांना स्पृहा जोशीच्या पात्राला ‘वेळेचे गणित विद्याला सोडवता येईल का’ असे अनेक प्रकारचे प्रश्न पडले आहेत. नक्की स्पृहाची भूमिका काय आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना ६ डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागेल’ असे उद्गार चित्रपटाचे दिग्दर्शक सौरभ वर्मा यांनी काढले. त्यांनी यापूर्वी ‘मिकी व्हायरस’ आणि ‘7 अवर्स टू गो’ आदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
‘जीसिम्स’चे अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार म्हणतात, ‘स्पृहा जोशी ही एक गुणी अभिनेत्री असून या चित्रपटामध्ये ती एका वेगळ्या लुक आणि भूमिकेमध्ये प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे आणि तिची ही भूमिका प्रेक्षकांना देखील नक्की आवडेल यात काही शंका नाही.
सोनाली कुलकर्णी ही या चित्रपटामध्ये मध्यवर्ती भूमिकेत दिसणार असून तिच्याबरोबर स्पृहा जोशी देखील या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. स्पृहा जोशी यापूर्वी बाबा, होम स्वीट होम, मोरया, देवा, पेइंग गेस्ट, मला काहीच प्रॉब्लेम नाही यांसारख्या चित्रपटामध्ये झळकली होती.
आपल्या भूमिकेविषयी बोलताना स्पृहा जोशी म्हणाली की “मला सौरभ वर्मा यांची कथा सांगण्याची शैली मला खूप आवडली. ज्या प्रकारे ते कथा सांगत होते त्यावरून या चित्रपटाची कथा खूप वेगळी आहे आणि या कथेत असं काही आहे की जे मी या आधी कधीही पाहिलेलं नाही. कथा ऐकल्यानंतर माझ्या भूमिकेची लांबी किती आहे याचा मी विचार केला नाही कारण मला माहित आहे की विक्की वेलिंगकरच्या कथेत विक्की ही विद्या शिवाय अपूर्ण आहे. मला ही भूमिका साकारताना खूप मज्जा आली आणि मला असं वाटतंय की प्रेक्षकांनाही ही भूमिका बघताना खूप चांगला अनुभव येईल.”
सौरभ वर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती जीसिम्सचे अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार तसेच प्रणय चोकसी, डान्सिंग शिवा प्रॉडक्शनचे अनुया चौहान कुडेचा, रितेश कुडेचा आणि लोकीज स्टुडीओचे सचिन लोखंडे आणि अतुल तारकर यांची आहे.