मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 25 सप्टेंबर 2019 (16:48 IST)

'रील' आणि 'रियल' पोलिसांची 'ग्रेट भेट'

भारताचा अग्रगण्य स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म असलेल्या एमएक्स प्लेअरवर मराठी ओरिजनल्स 'पांडू' ही नवीन आणि अनोखी वेबसिरीज सुरु झाली आहे. मुंबई पोलिसांच्या दैनंदिन आयुष्यावर आधारित असणाऱ्या या वेबसिरीजमध्ये सुहास शिरसाट आणि दीपक शिर्के मुख्य भूमिका निभावत आहे. या वेबसिरीजमध्ये पोलिसांच्या रोजच्या जीवनाचे चित्रण अतिशय रंजक आणि विनोदी पद्धतीने दाखवण्यात आले आहे. या वेबसिरीजच्या प्रमोशन वेळी दिग्दर्शक सारंग साठे यांनी शूटिंगच्या वेळी घडलेला एक गंमतीदार किस्सा सांगितला.
 
"पांडू' ही वेबसिरीज पोलिसांवर आधारित असल्याने आमचं बरंचसं शूटिंग हे पोलीस व्हॅन मध्येच व्हायचे. आम्हाला एका सोसायटीच्या आवारात आणि त्या सोसायटीच्या थोडे बाहेर अशी शूटिंगसाठी परवानगी मिळाली होती. तिथे आम्ही शूट करायचो. एकदा पेट्रोलिंगचा सीन शूट करत असताना, आम्ही गाडी चालवत नकळतपणे आमच्या नेमून दिलेल्या परिसराच्या बाहेर गेलो. थोडं पुढे गेल्यावर तिथल्या एका सिग्नलवर आम्हाला खऱ्या पोलिसांनी पकडले आणि आम्ही पुरते गोंधळून गेलो. सुरुवातीला काही सेकंद आम्हाला काही समजलेच नाही. आमच्या व्हॅन मध्ये बसलेल्या खोट्या पोलिसांना म्हणजेच सुहास शिरसाट आणि दीपक शिर्के ह्या दोघांना खरे पोलीस अगदी निरागसतेने सलाम करत होते. ते खोटे पोलीस आहेत आणि आम्ही शूटिंग करत आहोत हे त्यांना समजल्यावर त्यांनी आमच्याकडे शूटिंगसाठी आवश्यक परवानगी आहे का? अशी चौकशी केली. मात्र आमच्याकडे असलेली परवानगी आणि कागदपत्रे पुरेसे नव्हते. कारण अशा परवानगीच्या नियमात आता बरेच बदल झाले असल्याने अधिक कागदपत्रे आमच्याकडे नव्हती. यात आमचा बराच वेळ खर्च झाला. मात्र शेवटी सर्व कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करून आम्ही आमच्या शूटिंगला पुन्हा सुरवात केली. मात्र खोटे पोलीस ज्या पद्धतीने खऱ्या पोलिसांना सलाम करत होते, त्यांचा त्यावेळचा चेहरा आठवून आणि आमची अवस्था आठवून आम्ही पोट धरून धरून हसत होतो. आज सुद्धा आम्ही एकत्र जमतो तेव्हा हा किस्सा आठवून खूप हसतो. आता हसायला येते मात्र तेव्हा आमची पुरती घाबरगुंडी उडाली होती. हा आमच्या सर्वांसाठीच खूप मजेशीर आणि अविस्मरणीय प्रसंग होता किंबहुना कायम राहील."
 
'पांडू' ही वेबसिरीज आपल्याला एमएक्स प्लेयरवर विनामूल्य बघता येणार आहेत. 'पांडू या वेबसिरीजचे दिग्दर्शन सारंग साठे आणि अनुषा नंदा कुमार यांचे असून पोलिसांच्या न पाहिलेल्या जीवनाचे चित्रण या वेबसिरीजच्या माध्यमातून आपल्याला घडणार आहे.