सोमवार, 6 फेब्रुवारी 2023
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated: मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020 (11:46 IST)

शिवराज म्हणतो 'विकून टाक'

'विकून टाक’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून या ट्रेलरची सर्वत्रच चर्चा होत असताना आता या चित्रपटाचे टायटल सॉंग प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘विकून टाक’ असे या गाण्याचे बोल असून या चित्रपटाचा काही अंशी अर्थ या गाण्यातून स्पष्ट होत आहे. या गाण्यात चित्रपटातील नायक मुकुंद तोरंबे अगदी  छोट्या वस्तूपासून मोठ्या वस्तूपर्यंत सर्वच विकताना दिसत आहे. मोबाईलवर फोटो काढून ऑनलाइनवर वस्तूंची विक्री करून मुकुंद पैसे कमावतो. मंदिरातली घंटा असो किंवा पाण्याचा सार्वजनिक हापसा सगळ्याच वस्तू तो सर्रास विकताना दिसतो. मात्र तो हे सगळे नेमके का करत आहे?   याचे उत्तर आपल्याला चित्रपट पाहिल्यावर समजेलच.
 
'विकून टाक' या धमाकेदार गाण्याला अमितराज यांच्या भारदस्त आवाजामुळे आणि त्याच्या थिरकायला लावणाऱ्या संगीतामुळे एक वेगळीच उंची प्राप्त झाली आहे. तर गुरु ठाकूर यांनी या गाण्याला शब्दबद्ध केले आहे. या चित्रपटात शिवराज वायचळ, चंकी पांडे, रोहित माने, राधा सागर, ऋतुजा देशमुख, समीर चौगुले, हृषीकेश जोशी, वर्षा दांदळे, जयवंत वाडकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विवा इनएन प्रॉडक्शन, उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित आणि समीर पाटील दिग्दर्शित 'विकून टाक' हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे क्रिएटिव्ह कन्सल्टंट राजेंद्र वनमाळी असून सिद्धेश्वर एकांबे यांची कथा आणि चारुदत्त भागवत, समीर पाटील यांनी या सिनेमाची पटकथा लिहिली आहे.