मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 8 जानेवारी 2020 (10:35 IST)

'विकून टाक' म्हणत होणार नवीन वर्षात मोठा हास्यकल्लोळ

नवीन वर्षाची सुरुवात खळखळून हसत करण्यासाठी विवा इनएन प्रोडक्शन आणि उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित 'विकून टाक' या सिनेमाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टिझरमध्ये चंकी पांडेला बघताना चित्रपटाबद्दल असलेली उत्सुकता अधिकच वाढते. नेहमी आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे चंकी पांडे त्याच्या अरब शेखच्या भूमिकेतही भाव खाऊन जात आहेत. चंकी पांडे सोबतच शिवराज वायचळ, राधा सागर, रोहित माने, ऋतुजा देखमुख, समीर चौगुले, हृषीकेश जोशी, वर्षा दांदळे, जयवंत वाडकर या सगळ्यांचेच या टीझरमध्ये दर्शन घडते. मुकुंद म्हणजेच शिवराजच्या लग्नाची तयारी चालली असतानाच अब्दुल्ला म्हणजे चंकी पांडेची एन्ट्री होते. हा 'अब्दुला' मुकुंदच्या लग्नात 'बिन बुलाए मेहमान' बनून येतो आणि मुकुंदचे जीवनच बदलून जाते. सगळ्यांसाठीच अनोळखी असणारा 'अब्दुल्ला' अचानक दत्त म्हणून समोर उभा ठाकतो आणि चित्रपटाला वळण मिळते. आता हा अब्दुला नक्की कोण? तो का येतो? गावातील वस्तू का आणि कशा गायब होतात? या आणि अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी ३१ जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
'पोस्टर बॉईज', 'पोस्टर गर्ल' असे विनोदी चित्रपट दिग्दर्शित करणारे समीर पाटील 'विकून टाक' चित्रपटाचे देखील दिग्दर्शन करत आहे. 'विकून टाक' चित्रपटापूर्वी 'बालक पालक', 'येल्लो', 'डोक्याला शॉट' अशा हिट चित्रपटांची निर्मिती करणारे उत्तुंग हितेंद्र ठाकूर आणि विवा इनएन प्रोडक्शन यांनी या सिनेमाची निर्मिती केली असून क्रिएटिव्ह कन्सल्टंट म्हणून राजेंद्र वनमाळी यांनी काम पहिले आहे. तर  मग नवीन वर्षात मोठा हास्यकल्लोळ करण्यासाठी तयार राहा.