छातीत मार लागल्याने तरुण क्रिकेटपटूचा मृत्यू, खेळण्यासाठी कोलकाताहून दिल्लीत आला होता
क्रिकेट सामन्यादरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीतील सामन्यादरम्यान छातीत चेंडू लागल्याने त्याचा मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. मात्र, अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही. ही घटना स्वरूप नगर भागातील शाळेतील आहे. शुक्रवारी येथे क्रिकेट खेळत असलेल्या हबीब मंडल नावाच्या 30 वर्षीय तरुणाचा छातीत चेंडू लागल्याने त्याचा मृत्यू झाला. तो क्रिकेट खेळण्यासाठी कोलकाताहून दिल्लीत आला होता. शाळेच्या आवारातच तो क्रिकेट खेळत होता.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सामन्यादरम्यान चेंडू तरुणाच्या छातीवर लागला. यामुळे तो बेशुद्ध पडला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणताही एफआयआर दाखल केलेला नाही. याबाबत त्यांनी मृत हबीब मंडलच्या कुटुंबीयांना माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हबीबला कोणताही जुनाट आजार होता की नाही हे कुटुंबीय आल्यानंतरच समजेल.