सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 14 जून 2023 (21:50 IST)

तीन आठवड्यांच्या स्पेशल ट्रेनिंगनंतर अर्जुन करणार टीम इंडियात प्रवेश?

तेंडुलकरचा पूत्र अर्जुन याला मुंबई इंडियन्सने पदार्पणाची संधी दिली होती. लवकरच सर्वोच्च स्तरावर खेळण्यासाठी तयार होत असलेल्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) २० आश्वासक अष्टपैलू खेळाडूंना बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे तीन आठवड्यांच्या शिबिरासाठी बोलावले आहे. यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा समावेश आहे, जो गोव्यासाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळला होता, ज्याने इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये मुंबई इंडियन्स साठी पदार्पण केले होते.
 
बोर्डाच्या एका वरिष्ठ सूत्राने पीटीआयला सांगितले की, “इमर्जिंग आशिया कप (२३ वर्षांखालील) या वर्षाच्या शेवटी होणार आहे आणि बीसीसीआय तरुण खेळाडूंचा शोध घेत आहे. अष्टपैलू खेळाडूंचे शिबिर NCA चे क्रिकेट प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी सुचवले होते, जेणेकरून आम्हाला सर्व प्रकारातील अष्टपैलू क्रिकेटपटू शोधता येतील.
 
पीटीआयच्या म्हणण्यानुसार, शिव सुंदर दास यांच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ राष्ट्रीय निवड समितीने कामगिरी आणि क्षमतेच्या आधारे खेळाडूंची निवड केली. सूत्राने सांगितले की, “शिबिरात सहभागी प्रत्येक खेळाडू पूर्ण अष्टपैलू नाही. काही गोलंदाजी अष्टपैलू असतात तर काही फलंदाजी अष्टपैलू असतात. त्यांचा उद्देश त्यांच्यातील प्रतिभा वाढवणे आणि त्यांना टीम इंडियात खेळण्यासाठी तयार करणे हा आहे.” यामध्ये चेतन साकारिया, अभिषेक शर्मा, मोहित रेडकर, मानव सुतार, हर्षित राणा, दिविज मेहरा या खेळाडूंचा समावेश आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor