भारताचे तीन 'अ' संघ जाहीर, अनुष्का शर्मा टी-२० आणि एकदिवसीय संघांचे नेतृत्व करणार
इंग्लंड महिला 'अ' संघाच्या भारत दौऱ्यासाठी भारताचे तीन वेगवेगळे 'अ' संघ जाहीर करण्यात आले आहे. अनुष्का शर्माची टी-२० आणि एकदिवसीय संघांच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर मिन्नू मणी दोन्ही फॉरमॅटमध्ये उपकर्णधार असेल. बहुदिवसीय सामन्यात मिन्नू मणी संघाचे नेतृत्व करेल आणि तेजल हसबनीस उपकर्णधार असेल.
इंग्लंड महिला 'अ' संघ डिसेंबरमध्ये भारताचा दौरा करणार आहे, जिथे दोन्ही देशांमध्ये टी-२०, एकदिवसीय आणि बहुदिवसीय फॉरमॅटमध्ये सामने खेळले जातील. भारतीय महिला निवड समितीने या मालिकेसाठी भारताचे तीन वेगवेगळे 'अ' संघ जाहीर केले आहे.
या दौऱ्यावर दोन्ही संघ तीन टी-२०, तीन एकदिवसीय आणि एक बहुदिवसीय सामना खेळतील. टी-२० मालिकेतील सर्व सामने पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवले जातील. त्यानंतरची एकदिवसीय मालिका आणि बहुदिवसीय सामने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळले जातील.
अनुष्का शर्माची 'इंडिया ए'च्या टी-२० आणि एकदिवसीय संघांच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मिन्नू मणी दोन्ही फॉरमॅटमध्ये उपकर्णधार म्हणून काम पाहतील. टी-२० संघात वृंदा दिनेश, तनिषा सिंग, सानिका चाळके, निकी प्रसाद, जी कमलिनी, शिप्रा गिरी, अमनजोत कौर, श्रेयंका पाटील आणि काश्वी गौतम यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. एकदिवसीय संघातही अनेक तरुण आणि अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. या संघात वृंदा दिनेश, तनिषा सिंग, प्रिया पुनिया, निक्की प्रसाद, जी. कमलिनी, शिप्रा गिरी, मिन्नू मणी, तेजल हसबनीस, श्रेयंका पाटील आणि शबनम शकील यांचा समावेश आहे. अनुष्का शर्मा संघाचे नेतृत्व करणार आहे.
सामने कधी आणि कुठे खेळवले जातील?
इंग्लंड महिला 'अ' संघाचा भारत दौरा ३० नोव्हेंबर रोजी सुरू होत आहे. पहिला टी२० सामना पुण्यात दुपारी १:०० वाजता खेळला जाईल. दुसरा टी२० सामना ३ डिसेंबर रोजी, तर तिसरा ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६:०० वाजता सुरू होईल. त्यानंतर पहिला एकदिवसीय सामना ८ डिसेंबर रोजी मुंबईत सकाळी ९:०० वाजता खेळला जाईल. दुसरा एकदिवसीय सामना ११ डिसेंबर रोजी, तर तिसरा १४ डिसेंबर रोजी दुपारी २:०० वाजता सुरू होईल. या दौऱ्यातील अंतिम सामना १९ डिसेंबर रोजी मुंबईत सकाळी ९:३० वाजता बहुदिवसीय स्वरूपात खेळला जाईल.

