1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (08:06 IST)

Aus vs New: ऑस्ट्रेलिया अजिंक्य; मिचेल मार्शची तडाखेबंद खेळी

मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या दमदार अर्धशतकांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला 8 विकेट्सनी नमवत पहिल्यावहिल्या ट्वेन्टी20 विश्वचषकावर नाव कोरलं.
 
विजयासाठी 173 धावांचे लक्ष्य मिळालेल्या ऑस्ट्रेलियाला आरोन फिंचच्या रुपात धक्का बसला. मात्र त्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी केली.
 
वॉर्नरने 38 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 53 धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूने मिचेल मार्शने न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर जोरदार आक्रमण केलं. मार्शच्या आक्रमक पवित्र्यामुळे ऑस्ट्रेलियाला धावगतीची चिंता करावी लागली नाही.
 
मार्शने 50 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 77 धावांची दिमाखदार खेळी साकारली.
 
वॉर्नर बाद झाल्यानंतर मार्शला मॅक्सवेलची साथ मिळाली. मॅक्सवेलने 18 चेंडूत 28 धावांची शानदार खेळी केली.
 
केनचं अर्धशतक; न्यूझीलंडच्या दीडशेपार
कर्णधार केन विल्यमसनच्या 85 धावांच्या खेळीच्या बळावर न्यूझीलंडने 172 धावांची मजल मारली.
 
कर्णधार या नात्याने केनने 48 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकारांसह 85 धावांची शानदार खेळी केली. 21वर असताना जोश हेझलवूडने केनचा झेल सोडला. या जीवदानाचा फायदा उठवत केनने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा समाचार घेतला.
 
न्यूझीलंडने पहिल्या 10 षटकात 57 धावा केल्या मात्र उरलेल्या 10 षटकात त्यांनी 115 धावांची लूट केली. ट्वेन्टी20 विश्वचषकाच्या अंतिम लढतीतली ही सर्वोच्च धावसंख्या आहे.
 
मिचेल स्टार्कच्या दुसऱ्या षटकात न्यूझीलंडने 19 धावा वसूल केल्या. अॅडम झंपाने मार्टिल गप्तीलला बाद करत जोडी फोडली. गप्तीलने 35 चेंडूत 28 धावांची खेळी केली.
मॅक्सवेलच्या तिसऱ्या षटकात दोन षटकार लगावत केन विल्यमसनने अर्धशतक पूर्ण केलं.
 
ट्वेन्टी20 विश्वचषकाच्या अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला असून गोलंदाजीचा निर्णय घेतला.
 
पॉवरप्लेच्या 6 षटकात न्यूझीलंडने 32 धावांची मजल मारत सावध सुरुवात केली आहे. जोश हेझलवूडने डॅरेल मिचेलला बाद केलं.
 
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये आयसीसी ट्वेन्टी20 विश्वचषकाचा अंतिम मुकाबला होतो आहे. या दोन संघांमधील मुकाबल्याला ट्रान्स-टास्मानिअन असं संबोधलं जातं.
 
सेमी फायनलच्या लढतीत बाद झाल्यानंतर डेव्हॉन कॉनवेने नाराजी व्यक्त करताना हात बॅटवर आपटला होता. यामुळे कॉनवेच्या हाताला गंभीर दुखापत झाली.
दुखापतीतून सावरण्यासाठी वेळ लागणार असल्याने कॉनवे विश्वचषकाच्या अंतिम लढतीत तसंच आगामी भारत दौऱ्यात खेळू शकणार नाही.
 
कॉनवेऐवजी न्यूझीलंडने यष्टीरक्षक फलंदाज टीम सैफर्टला अंतिम अकरात संधी दिली आहे. सैफर्ट आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी खेळला आहे.
 
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या 14 ट्वेन्टी20 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने 9 तर न्यूझीलंडने 5 सामने जिंकले आहेत.
ट्वेन्टी20 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दुसऱ्यांदा आमनेसामने येत आहेत. यापूर्वी 2016च्या विश्वचषकात धरमशाला इथे झालेल्या लढतीत न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियावर 8 विकेट्सनी विजय मिळवला होता.
 
सहा वर्षांपूर्वी 2015 मध्ये 50 षटकांच्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा धुव्वा उडवला होता.
न्यूझीलंड सलग तिसऱ्या आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळत आहे. 2019 मध्ये 50 षटकांच्या विश्वचषकात तसंच 2021 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा संघ होता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या जेतेपदावर न्यूझीलंडने कब्जा केला होता.
 
दुबई येथे झालेल्या शेवटच्या 17 लढतीत 16 वेळा टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. अंतिम लढतीतही हाच ट्रेंड कायम राहतो का हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
 
दोन्ही संघांचा स्पर्धेतला आतापर्यंतचा प्रवास असा राहिला आहे.
 
ऑस्ट्रेलियाचा स्पर्धेतला प्रवास
वि.दक्षिण आफ्रिका- 5 विकेट्सनी विजयी
 
वि. श्रीलंका- 7 विकेट्स राखून विजयी
 
वि. इंग्लंड- 8 विकेट्सनी पराभूत
 
वि. बांगलादेश- 8 विकेट्सनी विजयी
 
वि. वेस्ट इंडिज- 8 विकेट्सनी विजयी
 
न्यूझीलंडचा स्पर्धेतला प्रवास
वि. पाकिस्तान- 5 विकेट्सनी पराभूत
 
वि. भारत- 8 विकेट्सनी विजयी
 
वि. स्कॉटलंड-16 धावांनी विजयी
 
वि. नामिबिया- 52 धावांनी विजयी
 
वि. अफगाणिस्तान- 8 विकेट्सनी विजयी
 
वि. इंग्लंड- 5 विकेट्सनी विजयी
 
विश्वचषक विजेते
2007- भारत
 
2009- पाकिस्तान
 
2010- इंग्लंड
 
2012-वेस्ट इंडिज
 
2014-श्रीलंका
 
2016-वेस्ट इंडिज
 
विश्वचषक मालिकावीर
2007- शाहिद आफ्रिदी
 
2009- तिलकरत्ने दिलशान
 
2010- केव्हिन पीटरसन
 
2012- शेन वॉटसन
 
2014- विराट कोहली
 
2016- विराट कोहली