सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 24 मार्च 2018 (11:18 IST)

प्रिया गुप्तांना कोट्यवधींची ऑफर, बीसीसीआयमध्ये वाद

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव अमिताभ चौधरी यांनी बोर्डाने नियु्क्त केलेल्या नव्या जनरल मॅनेजर्सच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे. बीसीसीआयने मार्केटिंग विभागाच्या जनरल मॅनेजरपदासाठी पत्रकार प्रिया गुप्ता यांची नियुक्ती केली आहे. मात्र, चौधरी यांच्या आक्षेपामुळे गुप्ता यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणामुळे बीसीसीआयधील कारभारातील अंतर्गत वादही पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
 
बीसीसीआयने गुप्ता यांना 1.65 कोटी प्रतिमहा वेतनाची ऑफर दिली होती. ही ऑफर त्यांनी स्वीकारली असली तरी सध्या त्यांची नियुक्ती वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. बीसीसीआयचे सचिव चौधरी यांनी नियुक्तीपत्रावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. या प्रकरणी चौधरी यांनी बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी, बीसीसीआयची प्रशासकीय समिती आणि अन्य सदस्यांना ई-मेलद्वारा माहिती देत नियुक्ती अयोग्य असल्याचे म्हटले आहे. 
 
यापूर्वी गुप्ता यांनी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणवर लिहिलेल्या लेखामुळे वाद ओढावून घेतला होता. क्लीवलेज प्रकरणात त्यांनी दीपिकाने गलिच्छपणा केला आहे, असा उल्लेख आपल्या लेखामध्ये केला होता. अमिताभ चौधरी यांनी वादग्रस्त लेख देखील बीसीसीआयच्या अधिकार्‍यांना पाठवल्याचे समजते. गुप्ता यांच्याकडे जनरल मॅनेजरचा पदभार सांभाळण्या इतका अनुभव नाही. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीपत्रावर स्वाक्षरी करणार नाही, अशी भूमिके त्यांनी घेतली. या शिवाय बोर्डाने अगोदरच यादी निश्चित केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.