शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: दुबई , बुधवार, 29 नोव्हेंबर 2017 (12:18 IST)

चेतेश्‍वर पुजारा आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानी

भारताचा मधल्या फळीचा आधारस्तंभ आणि तंत्रशुद्ध फलंदाज चेतेश्‍वर पुजाराने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील कामगिरीमुळे आयसीसीच्या नव्या कसोटी विश्‍वक्रमवारीतील फलंदाजांच्या मानांकन यादीत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तसेच याच कसोटीत द्विशतक झळकावणाऱ्या विराट कोहलीने पाचवा क्रमांक कायम राखला आहे. मुरली विजय 28व्या, तर रोहित शर्मा 46व्या क्रमांकावर आहेत.
 
इंग्लंडविरुद्ध पहिल्या ऍशेस कसोटी सामन्यात शतक झळकावणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ फलंदाजांच्या मानांकन यादीत पहिल्या क्रमांकावर असून श्रीलंकेविरुद्ध पहिल्या डावात 143 धावांची खेळी करणारा पुजारा दुसऱ्या स्थानावर आहे. पुजाराला या खेळीमुळे 22 गुणांचा लाभ झाला असून त्याच्या नावावर आता कारकिर्दीतील सर्वाधिक 888 गुणांची नोंद आहे.
 
इंग्लंडचा कर्णधार जो रूट तिसऱ्या, तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन चौथ्या क्रमांकावर आहेत.
दुसऱ्या कसोटीत आपले पाचवे द्विशतक झळकावणाऱ्या कोहलीला 11 गुणांचा लाभ झाला असून तो 877 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. कारकिर्दीतील 21वे कसोटी शतक झळकावणाऱ्या स्मिथला पाच गुणांचा फायदा झाला असून त्याचे आता 941 गुण झाले आहेत. सार्वकालिक यादीत स्मिथ पाचव्या क्रमांकावर आहे. सर डॉन ब्रॅडमन (961), लेन हटन (945), जॅक हॉब्ज (942), रिकी पॉन्टिंग (942) व पीटर मे (941) हे फलंदाज पहिल्या पाच क्रमांकांवर आहेत.